कासेगांव/प्रतिनिधी : सोलापूर जिल्ह्यातील साहित्यिकांना दरवर्षी विद्यापीठाच्या वतीने साहित्य पुरस्कार देण्यात यावेत, या मागणीचं निवेदन मंगळवारी, २८ मे रोजी सोलापूर जिल्ह्यातील साहित्यिकांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूरचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांना देण्यात आले.
साहित्य पुरस्कार कविता, कथा कादंबरी, ललित, नाटक, समीक्षा, बालसाहित्य, समग्र साहित्य अशा विविध साहित्यप्रकारांत देण्यात यावेत. तसेच या पुरस्कारांचे वितरण दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनादिवशी करण्यात यावे. हे पुरस्कार थोर साहित्यिक, बुद्धभुषणकार छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने देण्यात यावेत, असंही या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर सोलापूर जिल्ह्यातील ६४ साहित्यिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
याप्रसंगी कवीवर्य रामप्रभू माने, ज्येष्ठ साहित्यिक राजेंद्र भोसले, संध्या धर्माधिकारी, डाॅ.विद्या देशपांडे, प्रा. डॉ. सुवर्णा गुंड-चव्हाण, वंदना कुलकर्णी, रेणुका बुधारम, विमल माळी, डी. एन. जमादार, नरेंद्र गुंडेली, दत्तात्रय इंगळे, भगवान चौगुले, जावेद शेख, मयुरेश कुलकर्णी यांच्यासह अनेक साहित्यिक उपस्थित होते.