सोलापूर : साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्यावतीने प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यासाठी संस्थेची निवड केली जाणार आहे. तरी सोलापूर जिल्ह्यातील कौशल्य विकास व उद्योजकता प्रशिक्षण पोर्टलवर नोंदणी केलेल्या संस्थांनी आपला प्रस्ताव दि. ३० जून, २०२४ पर्यंत सोलापूर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सात रस्ता येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर करावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक आर. एच. चव्हाण यांनी केले आहे.
साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत मातंग समाज व तत्सम १२ पोट जातीतील कुटुंबाचे सामाजिक आर्थिक व शैक्षणिक उन्नती व्हावी, त्यांना रोजगार व स्वंयरोजगाराची साधने उपलब्ध व्हावी, यासाठी समाजातील गरजूंना आवश्यक त्या व्यवसायाचे प्रशिक्षण देवून त्यांना उपजिविकेचे साधन उपलब्ध होण्यासाठी प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहे. सोलापूर जिल्हा कार्यालयास सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरीता एकूण ५०० प्रशिक्षणार्थींना कौशल्य विकास उद्योजकता प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट प्राप्त झालेले आहे.
प्रशिक्षणार्थीने निवडलेल्या प्रशिक्षणाची फी कौशल्य विकास व उद्योजक विभागाने ठरवून दिलेल्या दराप्रमाणे अदा केली जाणार आहे. प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतर शासनाच्या नियमानुसार आवश्यक त्या परीक्षेला बसविण्याची जबाबदारी संस्थाचालकाची राहील, त्याशिवाय संस्थेची फी दिली जाणार नाही.
प्रशिक्षण संस्थेला प्रशिक्षण कालावधीनुसार टप्प्या- टप्प्याने प्रशिक्षण फी अदा करण्यात येईल. तरी इच्छुक संस्था चालकांनी आपला प्रस्ताव ३० जूनपर्यंत सादर करावेत. या तारखेनंतर प्रस्ताव स्विकारले जाणार नाहीत, असे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक आर.एच चव्हाण यांनी कळविलं आहे.