सोलापूर : रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या अनेक भागांना अक्षरशः झोडपलंय. वादळी वाऱ्यात अनेक झाडं, विद्युत खांब उन्मळून पडले. ग्रामीण परिसरात अनेक घरांवरील पत्रे उडून गेल्यानं अनेकांचे संसार उघड्यावर पडल्याचं दिसून आलंय.
या वादळ-वाऱ्याचा सर्वाधिक फटका दक्षिण सोलापूर तालुक्याला बसला. अक्कलकोट रोडवरील कुंभारी परिसरात अनेक विद्युत खांबचं आडव्या पडल्याने महावितरण कंपनीचं खूप मोठा नुकसान झालं आहे. या परिसरात पाऊस पडल्याने अनेक हॉटेल आणि धाब्यांचे नुकसान झालं असून इथं भयानक परिस्थिती आहे.
होटगी येथील टिकेकरवाडी इथंही सायंकाळी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. या वादळामुळे जुने झाडे उन्मळून पडली असून गावातील अनेक घरावरील पत्रे उडून गेली आहेत. काही घरांवर झाड पडल्याने घरांची पडझड झाली आहे. विजेचे खांब व तारा तुटून पडल्याने वीजपुरवठाही खंडित झाला आहे. ऐन उन्हाच्या गर्मीत पावसाच्या थंडाव्यामुळे नागरिकांत समाधान व्यक्त केले जात असले तरी टिकेकर वाडी येथील नागरिकांना मोठा फटका बसला असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुमारे तासभर पडलेल्या पावसामुळे ग्रामस्थांची तारांबळ उडाली होती.
या नैसर्गिक आपत्तीसंबंधी ग्रामस्थांनी तहसीलदार व तलाठी यांना संपर्क साधला, मात्र सोमवारी सकाळपर्यंत कोणत्याही अधिकाऱ्यांनं गावास भेट दिली नसल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं. गंगू निखिल सकट, दत्तूसिंग राजपूत, ललिता लोंढे, भोराम्मा अर्जुन बिराजदार, रमजान शेख, शगेरा शेख, बानू शेख आदी ग्रामस्थांच्या घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.