सोलापूर : डॉक्टरांनी कुटुंबियाच्या पूर्वपरवानगीशिवाय इंजेक्शन दिल्याने मुलाचा मृत्यू झाला. ही घटना २३ ऑगस्ट २०२२ रोजी येथील डॉ. तोतला यांच्या मल्टी स्पेशॉलिटी हॉस्पीटलमध्ये घडलीय. रुग्ण जिलानी यास निष्काळजीपणाने उपचार करून त्याच्या मृत्युस कारणीभूत ठरल्याप्रकरणी डॉ. नवीन तोतला यांच्याविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, शेजारच्या राज्यातील आळंद येथील रहिमतबी हुसेनसाब केन्नीवाले यांचा मुलगा १७ वर्षीय जिलानी यानं सुमारे २ वर्षांपूर्वी ऍसिड प्राशन केले होते, त्यास उपचारासाठी डॉ. अग्रवाल यांच्या नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आलं होतं. हा रूग्ण डॉ. नवीन सुभाष तोतला यांच्या देखरेखीखाली होता. तो बरा झाल्यावर त्याच्या गावी गेला.
त्यानंतर, २३ ऑगस्ट २०२२ रोजी रहिमतबी हुसेनसाब केन्नीवाले व मुलगा जिलानी हे १५ दिवसांनी डॉ. अग्रवाल नर्सिंग होम येथे तपासणीसाठी आले, त्यावेळी डॉ. अग्रवाल यांनी तुम्ही डॉ. तोतला यांच्याकडे जा, तेच उपचार करतील, असे सांगितल्याने ते दोघे तोतला मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलकडे गेले.
तेथे डॉ. तोतला यांना मुलाला खाल्लेले पचत नाही, उलटी होत आहे, असे सांगितल्याने यातील डॉ. तोतला यांनी जिलानी यास एक इंजेक्शन दिले. त्यावेळी जिलानी हा शुध्दीवरच होता, त्यानंतर थोड्या वेळाने डॉ. तोतला यांनी मुलगा जिलानी याच्या तोंडात नळी घातली. त्यावेळी त्यास त्रास होऊ लागल्याने तो हालचाल करू लागला. त्यावेळी डॉ. तोतला यांनी त्यास पुन्हा एक इंजेक्शन दिले, त्यावेळी जिलानी बेशुध्द झाला.
त्यानंतर डॉ. तोतला यांनी जिलानी यांच्या तोडांतून नळी बाहेर काढून त्यास उचलून बाहेर आणले, व अॅम्ब्युलन्समध्ये घालून आधार हॉस्पीटल येथे पाठवून दिले. तेथे गेल्यावर काहीच मिनीटांनी तेथील डॉक्टरांनी जिलानी याचं निधन झाल्याचं सांगितलं.
डॉ. तोतला यांनी त्या मुलाच्या आईच्या परवानगीशिवाय त्यास दोन इंजेक्शन देऊन मुलगा जिलानी ( मृत) यास निष्काळजीपणाने उपचार करून त्यांचे मृत्युस कारणीभूत ठरला. या प्रकरणी दाखल फिर्यादीनुसार सदर बझार पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री डॉ. तोतला यांच्याविरुद्ध भादवि ३०४ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. मपोसई व्हट्टे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.