Type Here to Get Search Results !

कर्तबगार अहिल्याराणी होळकर (जयंती दिन विशेष)

 

"भारतीय इतिहासानं दखल घ्यावी, असे बोटावर मोजता येतील, इतक्याच कर्तबगार महिला आहेत. यात प्रामुख्याने नामोल्लेख होतो, तो अहिल्याराणी होळकरांचा."

अहिल्याराणी होळकर यांच्या जन्मोत्सवानिमित्ताने त्यांच्या कार्याचा आढावा आपल्या साठी प्रेरणादायी आहे. त्याची ओळख करून देण्याचा छोटासा प्रयत्न ...


न्यायदान आणि प्रशासन व्यवस्था : 

सामान्य जनतेला शासन दरबारी व न्याय दरबारी सन्मान मिळावा असे अहिल्याराणींचे प्रशासन होते. राणी रयतेसाठी मायच्या मायेनेच प्रशासन राबवत असत. त्याचवेळी अंतर्गत प्रशासकीय नोकरांवर त्यांची शिस्तबद्ध जरब होती. प्रशासनाचे व न्यायाचे लाभ सामान्य रयतेला त्यांच्या गावपातळीवर मिळावेत. अशाप्रकारे अधिकारांचे पुर्ण विकेंद्रीकरण केलेले होते. ९० ते ९५ टक्के कामे गावपातळीवरच व्हावीत. अशीच रचना होती. तसा नियमित आढावा घेतला जायचा. न्यायासाठी कोणालाही खर्च पडत नव्हता. आज पंचायतराजचा आपण उदो उदो करत आहोत. त्याचा वापर अहिल्याराणींनी सन १७६५ पासूनच सुरु केले होते. आपल्याला न्याय मिळाला नाही, अशी एखाद्या सामान्य कष्टकऱ्याचीही समज झाल्यास, त्यास विनाअडथळा सरळ राजमातेकडे आपली बाजू मध्यस्थाशिवाय मांडता येत असे.  

           

"शेती व शेतकरी विकास :"

आपल्या राज्यात प्रथम शांतता स्थापित करण्यावर भर दिला. त्यानंतर गावोगावी सरकारी अधिकारी पाठवून गावपातळी पर्यंत शासनव्यवस्था निर्माण केली. गावचे जमीन क्षेत्र मोजून प्रथम पडीक जमीन लागवडीखाली आणली. त्यासाठी सरकारी खर्चाने शेती विकास करुन शेतकऱ्यांना जमीनीचे पट्टे दिले. बलूतेदार, शेतमजूर, शेतकरी यांना अवजारे बी बियाणे, बैलफाटा वा बिनव्याजी कर्ज सोयीनुसार उपलब्ध करून दिले. परंपरागत तसेच कोरडवाहू शेतीवर शेतकऱ्यांचे कुटुंब सुखासमाधानाने जीवन जगू शकत नाही. शेतीसाठी नदी नाल्यांवर बंधारे बांधले, विहीरी खोदल्या, बैल मोटेसाठी अर्थ सहाय्य दिले. ओलितासाठी प्रोत्साहन दिले. तसेच शेतकऱ्यांनी शेतीला पूरक व्यवसाय करावा म्हणून पशूपालन, मेंढीपालन, दुग्धव्यवसाय, चारा निर्मिती, फळशेती, फुलशेती भाजीपाला इत्यादीस प्रोत्साहन दिले. करवसुलीत सवलत दिल्या. उत्पन्न आणि उत्पादन दोन्ही वाढल्याने कराचा बोजा कमी झाला. राज्याचे महसूली उत्पन्न वाढले. त्यामुळे होळकर राज्यात सर्वात जास्त शेती लागवडीखाली आली. तसेच शेतीच्या प्रतवारीनुसार वेगवेगळ्या पिकांची लागवड केली. सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्याने राज्य खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम झाले. शेतकऱ्याचा आर्थिक विकास झाला. राज्यही श्रीमंत झाले.

श्रमकऱ्यांचा विकास : 

कलाकार, शिल्पकार, कलावंत, साहित्यिक, शाहीर, अलुतेदार इत्यादी स्वयंरोजगारातून पोट भरणाऱ्या श्रमकऱ्यांसाठी विशेष अर्थसहाय्य योजना लागू केली. त्यांच्या उत्पादनाचा दर्जा जगाच्या बाजारपेठेत टिकावा यासाठी त्यांना प्रशिक्षणाची, कार्यशाळेची व्यवस्था करुन उत्तम प्रशिक्षक नेमले. केंद्रशासनाने आणि राज्यशासनाने यानंतर एम सी व्ही सी, आय टी आय सुरू केल्याचे दिसते. अहिल्याराणींनी स्वयंरोजगारातून निर्माण झालेल्या वस्तूसाठी राज्यांतर्गत तसेच राज्याबाहेरही बाजारपेठा उपलब्ध करून दिल्या. विशेष निर्यात धोरण अवलंबिले. श्रम करण्याची तयारी असणाऱ्या तसेच भुमिहीन बेरोजगार तरुणांना होळकर संस्थानात पात्रतेनुसार फौजेत भरती केली जात. अथवा कौशल्य पाहून श्रमाचे काम दिले जात असतं. या कुशल अकुशल श्रमकऱ्यांचा वापर करूनच राजमाता आपल्या संस्थानात लोकोपयोगी योजना राबविल्या होत्या. मागेल त्याला काम मिळत होते. राज्यांतर्गत सुरक्षाव्यवस्था राखण्यासाठी अशा तरुणांचा उपयोग झाला. त्याना रोजगार आणि सन्मान मिळाला.

लोककलांना प्रोत्साहन: 

लोककला आणि लोककलावंतांना इंदोर (होळकर) संस्थानात चांगले प्रोत्साहन मिळाले. कला, साहित्य, संस्कृती, भजन, कीर्तन, शाहीर, नाट्य, लोकसंगीत इत्यादी समाजप्रबोधनाच्या लोककलांचा उपयोग समाजप्रबोधनासाठी केला गेला. त्यासाठी राजमातानी आपल्या राज्याचे विशेष सांस्कृतिक धोरण तयार केले. आर्थिकदृष्ट्या श्रीमंतीबरोबर सांस्कृतिक श्रीमंतीही असावी. राज्यात व्यक्ती विकासावर भर दिले गेले होते. समाजात समृद्धी होती. सामान्यपणे आर्थिक श्रीमंती आल्यावर समाजात व्यसनांचे प्रमाण वाढते. ते टाळण्यासाठी गावपातळीवर स्थानिक लोककलावंताना राजसन्मान दिला. कलाकारांना योग्य ती मानधन-बिदागी दिली जात असे. त्यांची किर्ती ऐकूनच शाहीर अनंत फंदी, कवी मोरोपंत आदी मान्यवर इंदोर येथे आपली सेवा बजावली होती. 

... चौकट...

अहिल्याराणींनी आपल्या संस्थानात वन औषधींची लागवड , मानवाबरोबर पशू-पक्षांसाठी दवाखाने, वाटसरूंसाठी पाणपोई-निवाऱ्याची सोय, तिर्थक्षेत्रात भक्तनिवास, रस्त्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवड आदींची सोय केली.


=========

राम गायकवाड, मराठा सेवा संघ, सोलापूर