तातडीने दुरुस्ती करून गैरसोय टाळा ; उद्योजक केतन वोरा यांची मागणी
सोलापूर : बालाजी अमाईन्सच्या वतीने ०१ कोटी २७ लाख रुपये सीएसआर निधीतून रूपाभवानी स्मशानभूमीत बसविलेली विद्युत दाहिनी महापालिकेच्या उदासीनतेमुळे बंद अवस्थेत आहे. महापालिकेने तात्काळ विद्युत वाहिनीची तांत्रिक दुरुस्ती करून नागरिकांची होणारी गैरसोय टाळावी, अशी मागणी समाजसेवक तथा उद्योजक केतन वोरा यांनी पत्रकार परिषदेत केलीय.
कोव्हिड-१९ प्रतिबंधात्मक उपायोजना करीत असताना इलेक्ट्रिक विद्युत दाहिनीची सोय उपलब्ध करण्यासाठी बालाजी अमाईन्स कंपनीच्या माध्यमातून कंपनीच्या सामाजिक दायित्व (सीएसआर) निधीतून सोलापूर महापालिकेच्या रुपाभवानी स्मशानभूमी येथे अत्याधुनिक विद्युत दाहिनी बसविणे व आजूबाजुचा परिसर विकसित करण्यासाठी सुमारे ०१ कोटी २७ लाख रुपयाचा निधी उपलब्ध करुन दिला.
या निधीतून रूपा भवानी स्मशानभूमीत विद्युत दाहिनी, श्रध्दांजली सभागृह/वेटिंग हॉल (१४मी. x १२मी.), पुरुष व महिला यांच्यासाठी ०२ स्वतंत्र स्वच्छता गृह युनिट व हातपाय धुण्याकरिता स्वतंत्र हँडवॉश सेंटर, विद्युत दाहिनी परिसरास पूर्ण बंदीस्त करण्यासाठी चेनलिंक फेन्सिग व गेट, विद्युत दाहिनी परिसरात छोटे उद्यान, वृक्षारोपण, अंत्यविधीस उपस्थित नागरिकांना बसण्याकरिता मार्बलचे १७ बाकडे, पूर्ण परिसरास रंगरंगोटी व लाईट फिटींग्ज गुणवत्तापूर्ण, नेटक्या पद्धतीने पूर्ण करून देण्यात आली. बालाजी अमाईन्स कंपनीच्या सामाजिक दायित्व निधीतून (सीएसआर) हे मोठे काम शहरवासीयांच्या मदतीसाठी महापालिकेस मोलाचे सहकार्य केले आहे.
दरम्यान, बालाजी अमाईन्स कंपनीच्या वतीने येथील विद्युत दाहिनी व सर्व परिसराचे २६ जानेवारी २०२२ रोजी लोकार्पण करून महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आले. बालाजी अमाईन्स कंपनीच्या वतीने विद्युत दाहिनी देखभाल दुरुस्तीचा मक्ता ०२ वर्षासाठी मनीष इंटरप्राईजेस या मक्तेदाराला देण्यात आला. तसा ०२ वर्षाचा करारही करण्यात आला. दरम्यानच्या काळात या देखभाल दुरुस्ती मक्ता कराराची मुदत, ०५ जानेवारी २०२४ रोजी संपली.
त्यानंतर महापालिका प्रशासनाच्या वतीने येथील विद्युत दाहिनीची देखभाल दुरुस्ती करावयाची आहे, मात्र गेल्या १० ते १५ दिवसापासून येथील विद्युत दाहिनी तांत्रिक बिघाडामुळे बंद आहे. १४ मार्च रोजी अंत्यसंस्कारासाठी तेथे विचारणा केली असता, ही मशीन बंद असल्याचे सांगण्यात आले. स्पेअर पार्ट बिघडल्याने मशीन बंद आहे, स्पेअर पार्ट मागविण्यात येत आहे. त्यानंतर दुरुस्ती करण्यात येईल, असे कर्मचाऱ्याकडून सांगण्यात आले. अद्यापही महापालिका प्रशासनाकडून ही विद्युत वहिनी सुरू करण्यात आली नाही.
परिणामी कोट्यावधी रुपयाचा खर्च करून सीएसआर फंडातून बालाजी अमाईन्सने बसविलेल्या मशीनच्या देखभाल दुरुस्तीकडे महापालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. दुरुस्ती कामासाठी दिरंगाई होत आहे, ही गंभीर बाब आहे. यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. महापालिका देखभाल दुरुस्ती कडे दुर्लक्ष करत असेल तर कोट्यावधी निधीतून कामे करून काय उपयोग, असा सवाल उद्योजक केतन वोरा यांनी केला आहे.
महापालिका प्रशासनाने तातडीने विद्युत दाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे आणि नागरिकांची सोय करावी, अशी मागणीही यावेळी उद्योजक केतन वोरा यांनी केली आहे.
..... चौकट .......
महापालिकेला देखभाल दुरुस्ती जमत नसल्यास मक्तेदार नेमावा : केतन वोरा
रूपाभवानी स्मशानभूमीतील विद्युत दाहिनीची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी बालाजी अमाईन्सने मागील ०२ वर्ष मक्ता दिला होता. त्यामुळे ०२ वर्षात कोणतीही अडचण आली नाही. त्याचप्रमाणे महापालिकेला जमत नसल्यास मक्तेदार नेमून त्यांच्याकडून हे काम करून घ्यावे, अशी मागणी उद्योजक केतन वोरा यांनी केलीय.