धरणीकंपानं मराठवाडा हादरला ! हिंगोलीतील रामेश्वर तांडा हे भूकंपाचे केंद्र

shivrajya patra

हिंगोली : मराठवाडा पुन्हा धरणीकंपानं हादरलाय. या भूकंपानं गेल्या ३० वर्षांपूर्वीच्या कटू आठवणींना पुन्हा एकदा उजाळा दिलाय. गुरूवारी, २१ मार्च रोजी सकाळी ०६: ०८: ३० वाजता भूकंप झाल्याची नोंद राष्ट्रीय भूकंप मापण यंत्रणेवर दिसून आलीय. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात असलेल्या कुरुंदा व दांडेगावच्या उत्तर भागातील रामेश्वर तांड्याच्या उत्तर भागात भूकंपाचे केंद्र असल्याचे दिसून आले. याची खोली १० किलोमीटर असल्याचे दिसत आहे. त्याची ४.५ रिश्टर स्केल तीव्रतेची नोंद झालीय.

मराठवाड्यातील हिंगोली, परभणी व नांदेड भागात गुरुवारी सकाळी ६.०८ मिनिटांनी भूकंपाचा तीव्र धक्का बसला. वसमत तालुक्यातील दांडेगावजवळील रामेश्वर तांडा हे भूकंपाचे केंद्रस्थान असावे, असे सांगण्यात येत आहे. या भूकंपामुळे दांडेगाव आणि परिसरातील काही घरांना तडे गेल्याचे वृत्त असून दोन घरे पडल्याची माहिती वसमतचे पूर्णा कारखान्याचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी दिली.

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी या वृत्तास दुजोरा दिला असून यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे ते म्हणाले. यापूर्वीही या भागात भूगर्भातून मोठे आवाज झाल्याचे अहवाल पाठविण्यात आले होते.

भूकंपाची खोली १० किलोमीटरच्या परिसरात असून इतक्या मोठ्या धक्क्यानंतर पुन्हा दुसराही ३.६ रिश्टर स्केलचा धक्का जाणवला. लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथे ३० सप्टेंबर १९९३ रोजी बसलेल्या धक्क्यानंतर हा अलिकडच्या काळातील मोठा धक्का असल्याचे सांगण्यात येते. 

या धक्क्यामुळे नागरिक भयभीत झाले असून धक्का जाणवता क्षणी अनेकजण घराच्या बाहेर पडले. काही जुन्या घरांना तडे गेल्याचेही सांगण्यात येत आहे. कोणत्या गावात नुकसान झाले आहे का, याची माहिती एकत्रित केली जात असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील काही भागांना या भूकंपाची तीव्रता जाणवल्याचे सांगण्यात आले.

....... चौकट ........

लगेचच दुसरा हलका धक्का !

पहिल्या धक्क्यानंतर अकरा मिनिटांनी म्हणजे  सकाळी ०६ :१९ :०५ वाजता ३.६ रिश्टर स्केल चा भूकंप झाल्याची नोंद राष्ट्रीय भूकंप मापण यंत्रणेवर दिसून आली. मात्र या भूकंपाचे केंद्र तीन किलोमीटर दक्षिणेला असलेल्या कुरुंदा व दांडेगावच्या रामेश्वर तांड्याच्या दक्षिण भागात असल्याचे दिसून आले. याही भूकंपाची खोली १० किलोमीटर असल्याचे दिसत आहे. मराठवाड्यातील १९९३ च्या भूकंपानंतरचा हा सर्वात मोठा आहे. यावेळेस हिंगोली, नांदेड, परभणी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी या भूकंपाचे धक्के बसल्याचे दूरध्वनी आले. 

श्रीनिवास औंधकर, संचालक,

एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर.



To Top