रमजान महिना प्रामुख्याने ओळखला जातो तो रोजे,सहेरी आणि इफ्तार यासाठी.
इस्लाम धर्माची जी पाच मूलतत्त्वे आहेत, त्यामध्ये रोजा एक आहे. कलमा, नमाज, रोजा, जकात आणि हज. ही ती पाच मूलतत्वे. यांना इस्लामचे बुनियादी सुतून अर्थात पायाभूत स्तंभ संबोधले जाते.
रोजे प्रत्येक मुस्लिम स्त्री आणि पुरुषावर फर्ज आहेत, म्हणजे अनिवार्य आहेत. वयाच्या दहाव्या वर्षानंतर रोजे फर्ज होतात. ते दरवर्षी ठेवले पाहिजे, असे धार्मिक संकेत आहेत. मोठे आजारपण किंवा प्रकृती बिघडण्याचा धोका असलेल्या परिस्थितीमध्ये रोजे न करण्याची सवलत आहे. मात्र नंतर ते पूर्ण केले पाहिजे. यासाठी प्रामुख्याने पहाटेचे केले जाणारे जेवण म्हणजे सहेरी. हजरत प्रेषित पैगंबर यांनी याबाबत म्हटले आहे कि, सहरी खात जा, त्यात बरकत आहे.
सहरीमध्ये एकदम न खाणे किंवा खूप पोटभर खाणे अपेक्षित नाही. पाण्याचे दोन घोट किंवा जेवणाचे दोन घास पुरेसे आहेत. सहेरी न खाता निरंकार उपवास अर्थात रोजा मान्य नाही.
सायंकाळी रोजा सोडण्याची प्रक्रिया म्हणजे इफ्तार. यासाठी सुद्धा फार काही चांगले पदार्थ पाहिजेच, असे नाही. काही नसले तर एक खजूर किंवा ग्लासभर पाणी पिऊन देखील रोजा इफ्तार केला जातो. नंतर आपले नियमित जेवण जे घरात असेल ते करावे. अलीकडच्या काळामध्ये इफ्तारसाठी वेगवेगळ्या प्रकारची फळे आणि वेगवेगळे खाद्यपदार्थ यांचा वापर केला जातो. परंतु हे सर्व आवश्यक नाही. उपलब्ध असेल, त्यानुसार रोजा इफ्तार करावा, असे धार्मिक संकेत आहेत.
रोजेदाराबरोबरच रोजा इफ्तार करवणाऱ्याला सुद्धा मोठे पुण्य प्राप्त होते. म्हणूनच सायंकाळी मशिदीमध्ये रोजेदारांसाठी इफ्तारचे साहित्य दिले जाते. यात सर्व धर्मीय बांधव सहभागी होतात.
रोजे अर्थात उपवास यांना धार्मिकतेबरोबरच वैज्ञानिक आधार सुद्धा आहे. महिनाभर उपवास केल्याने कॅन्सरचा धोका नष्ट होतो, असे जपानी वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनामध्ये दिसून आले आहे. महिनाभर रोजा धरणारी व्यक्ती पुढे वर्षभर कधीही मोठ्या आजाराला सामोरे जात नाही, हे देखील आरोग्य विज्ञानामध्ये सिद्ध झाले आहे. प्रत्येक धर्मामध्ये उपवास म्हणजे रोजे ठेवण्याची प्रथा आहे. त्याच्या पद्धती मात्र काही प्रमाणात वेगळ्या आहेत. शरीराच्या सफाईसाठी रोजे आवश्यक आहेत. त्याचबरोबर आत्मिक समाधान आणि जीवनामध्ये संयम, सत्य आणि शांती प्राप्त करण्यासाठी देखील रोजे आवश्यक आहेत. (क्रमशः)
सलीमखान पठाण
9226408082