Type Here to Get Search Results !

कला हे जिवन जगण्याचे साधन : कुलगुरु प्रा. प्रकाश महानवर



युवा स्पंदन सांस्कृतिक महोत्सवाचे जल्लोषात उद्धाटन

सोलापूर : शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी युवा स्पंदन सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन विद्यार्थी कल्याण विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांमधील कला गुण हे अर्थाजनापेक्षा जीवन जगण्याचे आणि मानसिक आधार देण्याचे साधन आहे. असे प्रतिपादन कुलगुरु प्रा. प्रकाश महानवर यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने विद्यापीठ परिसरातील अधिविभागांचा युवा स्पंदन सांस्कृतिक महोत्सव 2024 आयोजित करण्यात आला आहे. या युवा स्पंदन सांस्कृतिक महोत्सवाचे उद्धाटन कुलगुरु प्रा. प्रकाश महानवर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. यावेळी कुलगुरु प्रा. प्रकाश महानवर बोलत होते. 

यावेळी प्रमुख पाहुणे प्रसिध्द उद्योजिका श्रीमती सुहासिनी शाह, नाट्यकलावंत आणि प्रसिध्द दिग्दर्शक श्रीपाद येरमाळकर, प्र. कुलगुरु प्रा. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, विद्यार्थी कल्यण विभागाचे डॉ. केदारनाथ काळवणे, समन्वयक डॉ. विकास कडू यांच्या उपस्थित संपन्न झाले. युवा स्पंदन सांस्कृतिक महोत्सवात विद्यापीठातील विविध संकुलातील 250 विद्यार्थ्यांनी विविध कला प्रकारात सहभाग घेतला.



यावेळी कुलगुरु प्रा. प्रकाश महानवर म्हणाले, विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच कलेच्या माध्यमातुन जगता आले पाहीजे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी महाविद्यालय आणि विद्यापीठ स्तरावर युवा स्पंदन सांस्कृतीक महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. यापुढे विद्यापीठात युवा स्पंदन सांस्कृतीक महोत्वामध्ये खंड पडणार नसल्याचेही कुलगुरु महानवर यांनी स्पष्ट केले. 

उद्धाटन प्रसंगी नाट्य कलावंत श्रीपाद येरमाळकर म्हणाल, जशी पोटाची भूक भागवण्यासाठी अन्न खावे लागते तसे मन, मेंदुची भूक भागवण्यासाठी कला जपावी लागते. कलाकार हा नेहमी समाजाच्या जानिवा घेवून जगत असतो. त्यामुळे इंटरनेट, मोबाईलच्या माध्यमातुन आपली कला लोकांपर्यंत पोहचवता येते. सध्या विविध विषयावर सामाजिक नाटके येत आहेत. ती पहाण्यासाठी चांगले रसिक निर्माण होणे आवश्यक आहे. असेही येरमाळकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

यावेळी बोलताना उद्योजिका सुहासिनी शहा म्हणाल्या, शिक्षणाबरोबरच कलाकार घडणे आवश्यक आहे. कला हीच विद्यार्थ्यांना यश-अपयश पचवायला शिकवते आणि जिवनात पुढे घेवून जाते. केवळ नाट्यक्षेतात कलावंताबरोबरच नाट्य रसिक देखिल निर्माण होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी आयुष्यभर जीवनाला दिशा देण्यासाठी कला जपणे आवश्यक असल्याचेही श्रीमती शहा यांनी यावेळी स्पष्ट केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विकास कडू यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. ममता बोल्ली आणि डॉ. अंबादास भास्के यांनी केले. तर विद्यार्थी कल्याण विभागाचे प्रमुख डॉ. केदारनाथ काळवणे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला विद्यापीठातील विद्यार्थी विद्यार्थीनींनी सहभाग घेतला. यावेळी विद्यापीठातील विविध संकुलाचे प्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.