Type Here to Get Search Results !

'या' मृत्युप्रकरणातील आरोपींचा न्यायालयाने फेटाळला जामिन अर्ज : DGP अॕड. प्रदीपसिंग राजपूत



सोलापूर :सोलापुरातील बहुचर्चित सालियॉ शेख मृत्यू प्रकरणातील आरोपींच्या जामीन अर्जावर जिल्हा सरकारी वकील एडवोकेट प्रदीपसिंग राजपूत यांनी नोंदविलेला युक्तीवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश (३) श्रीमती के. डी. शिरभाते यांनी समीर शेख याच्यासह तिघांचा जिल्हा व सत्र न्यायाधीश (३) श्रीमती के. डी. शिरभाते यांनी समीर चाँदसाब शेख याच्यासह तिघांचा जामीन अर्ज फेटाळला.

थोडक्यात हकीकत अशी की, महिबूब साहेबलाल शेख (वय ५२ वर्षे, रा.ओम नमः शिवाय नगर हत्तुरे वस्ती, सोलापूर) हे कुटुंबियांसोबत एकत्र राहण्यास असून कुमठे गावामध्ये राहणारे सालियॉ शेख हिच्या मैत्रिणी हे त्यांच्या घरी ये-जा करत असत. त्यामुळे सालियाँ ही तिच्या मैत्रिणीचा भाऊ आरोपी समीर चाँदसाब शेख याला यास ओळखत होती. त्याचबरोबर फिर्यादी हे  समीर याचे मित्र सलमान पीरसाब शेख व वसीम सैपन शेख यांच्या  देखील ओळखीची आहे. सन २०१९ मध्ये आरोपीची बहिण ही सालियाँ म्हणत होती की, तिचा भाऊ जुनैत याच्यासोबत लग्न कर. परंतु त्यावेळी महिबूब शेख व सालियॉंने . लग्नास नकार दिलेला होता. 

काही दिवसांनी आरोपी समीर हा फिर्यादीच्या मुलीस लग्नासाठी मागणी घालत होता. त्यावेळी फिर्यादीच्या मुलीने नकार दिला होता. फिर्यादीची मुलगी ही सोलापूर येथील हॉस्पिटल येथे कामास असताना आरोपी समीर हा हॉस्पिटलबाहेर चक्कर मारणे, तिच्याशी बोलण्याचा सारखा प्रयत्न  करत होता. एके दिवशी तिला जबरदस्तीने आरोपी समीर हा त्याचा मित्र आरोपी वसीम शेख याच्यामार्फत फिर्यादीच्या मुलीस इडली-वडा पाठवला होता. 

तेव्हा फिर्यादीच्या मुलीने आरोपी समीर व वसीम यास याची काही गरज नाही, म्हणून तेथून हाकलून दिले होते. हा प्रकार काही दिवसांनी मयत सालियाँ हिने फिर्यादीस सांगितला होता. त्यावेळी फिर्यादी व त्यांचे नातेवाईक हे आरोपी समीर याच्या घरी जावून घडला प्रकार आरोपी समीर याच्या वडीलांना सांगून त्यास समज देण्यास सांगितले होते. तसेच फिर्यादी हे आरोपी समीर याच्या जवळच्या नातेवाईकास देखील वारंवार समक्ष भेटून आरोपी समीर यास समजावून सांगण्यास सांगत होते.

फेब्रुवारी २०२३ मध्ये फिर्यादीच्या नातेवाईकांनी मयत सालियाँच्या लग्नासाठी स्थळ आणले होते. त्याप्रमाणे फिर्यादी व त्यांच्या मुलीने नातेवाईकांनी सुचवलेल्या स्थळी लग्न करायचे ठरवले होते. त्याप्रमाणे लग्नाची तारीख १८ डिसेंबर २०२३ ही ठरवलेली होती. ठरल्याप्रमाणे ११ डिसेंबर रोजी साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडला. 

त्यांनतर दिनांक १४ डिसेंबर रोजी लग्न ठरलेल्या नवरदेवाने फिर्यादीच्या मुलीस फोन करुन सांगितले की, "माझ्सा इन्स्टा अकाऊंटवर एका व्यक्तिने मेसेज करुन माझा मोबाईल नंबर घेतला आहे, त्यानंतर काही वेळाने कॉल आला, त्यावेळी त्या व्यक्तिने, माझा भाऊ समीर व सालियाँ यांचे ०४ वर्षापासून प्रेमसंबंध आहेत, ते दोघे लग्न करणार आहेत, तु तिच्याशी लग्न करु नकोस. तुझ्या वाॕटसप वर घाण फोटो व्हीडीओ पाठवले आहे." असे सांगितले. हा प्रकार फिर्यादीच्या मुलीने फिर्यादीस सांगितला. 

त्यावेळी फिर्यादीने सदर फोन नंबरवर फोन केला असता, समोरचा व्यक्ती आरोपी सलमान असल्याचे फिर्यादीस समजले. तेंव्हा घडल्या प्रकाराबाबत फिर्यादीने आरोपीस विचारणा केली असता, आरोपी म्हणाला की, "हो, मी, समीर व वसीमनेच सर्व फोटो-व्हिडीओ पाठविले आहे. तुला कोणाकडे जायचे आहे, त्याच्याकडे जा, आम्ही कुणाला घाबरत नाही." असे सांगितले.

तेव्हा फिर्यादीने विजापूर नाका पोलिस ठाण्यात  आरोपी समीर, सलमान व वसीम यांच्याविरुद्ध तक्रार अर्ज दाखल केला. त्यावेळी पोलिसांनी आरोपी यांना समज दिली होती. तरीदेखील आरोपींनी संगनमत करुन फिर्यादीचा होणारा जावई यास दिनांक १६ डिसेंबर रोजी अश्लिल फोटो व व्हीडीओ पाठवले होते. 

त्यामुळे फिर्यादीची मुलगी ही नैराश्य अवस्थेत होती. ती सतत म्हणत होती की, "माझ्या फोटोचे इडिटींग करुन माझी बदनामी केली आहे, माझी व माझ्या वडीलांची समाजामध्ये काहीच इज्जत राहिलेली नाही, आता जगून तरी काय फायदा म्हणून सतत तणावाखाली जगत होती. तरीसुध्दा लग्न ठरल्याप्रमाणे फिर्यादीचा होणारा जावई फिर्यादीचे मुली सोबत लग्न करण्यास तयार होता. त्यामुळे ठरल्याप्रमाणे दिनांक १८ डिसेंबर रोजी लग्नाची सर्व तयारी करण्यात आली होती.

त्याप्रमाणे दिनांक १७ डिसेंबर रोजी रात्री फिर्यादीच्या घरी हळदीचा कार्यक्रम सोहळा पार पडला. कार्यक्रम संपल्यानंतर फिर्यादी व त्यांचे नातेवाईक सर्व एकत्र दिनांक १८ डिसेंबरच्या पहाटे ०३:०० वा. झोपी गेले. त्यानंतर सकाळी ०५:३० वा. फिर्यादीचा लहान मुलगा हा उठला व त्याला त्याची बहिण दिसली नाही. त्यामुळे त्याने सर्वांना उठवले व फिर्यादीच्या मुलीचा शोध घेतला असता ती सापडली नाही.

तिच्या बेडरुमचा दरवाजा आतून बंद होता. तेंव्हा फिर्यादीने दरवाजा तोडून पाहिले, असता सिलिंग फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत फिर्यादीची सालियाँ दिसून आली. त्यानंतर काही वेळाने पोलिस आले, फिर्यादीच्या मुलीस सिव्हील हॉस्पिटल येथे घेऊन गेले असता डॉक्टरांनी ती मयत झाली असल्याचे घोषित केले. याबाबत फिर्यादीने विजापूर नाका पोलिस ठाण्यात  रितसर तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा तपास करुन पोलीसांनी आरोपी यांना अटक केली.

या कामी शासनातर्फे सर्व हकीकत योग्यरीत्या न्यायालयापुढे सांगितली, तसेच फिर्यादी, पंच, घटनास्थळचा पंचनामा, मयताचे कपडे, नेत्र साक्षीदार, वैद्यकिय अधिकारी यांचा अहवाल, पोस्ट मार्टम रिपोर्ट, अश्लिल फोटो व व्हीडीओ पाठवलेले स्क्रिन शॉट, यातील तपासिक अधिकारी व घटनास्थळाचे फोटो काढणारे फोटोग्राफर या सर्वांचे पुरावे न्यायालयास सादर केले. 

यात जिल्हा सरकारी वकील प्रदिपसिंग राजपूत यांनी केलेला युक्तीवाद असा की, सदर प्रकरणातील मयत मुलगी सालियाँ हिने पोलिसांना लेखी अर्ज करुन कळवले होते की, "आरोपींकडून सतत त्रास होत आहे व तिच्या होणा- या पतीस अश्लिल फोटो व व्हीडीओ इडिटींग करुन या मुलीस सोबत लग्ळ करु नका." अशा प्रकारे संपर्क करुन मुलीची बदनामी व धमकी देण्यात आली होती. 

सदरच्या अर्जामध्ये मयत सालिया ही नैराश्य अवस्थेत जीवन जगत होती व असेही नमूद केले होते की, "भविष्यात हा त्रास संपला नाही, तर ती आत्महत्या करणार आहे व सदर आत्महत्येस आरोपीच कारणीभूत असणार आहेत." असे ठळकपणे नमूद केलेले होते. 

तरी या तक्रारीची दखल पोलिसांनी घेतली असता, आरोपींकडून मयतास त्रास देणे कमी होत नव्हते. तिच्या घरच्यांनाही शिवीगाळ करुन जीवे ठार मारण्याची धमकी देणे चालूच होते." या प्रकरणात नैराश्यात जाऊन फिर्यादीची मुलगी हळदीच्या अंगाने, १८ डिसेंबर रोजी पहाटे ०३:०० ते ०५:०० वा. च्या दरम्मान राहत्या घरी गळफास घेतला. हा युक्तीवाद ग्राह्य धरुन जिल्हा व सत्र न्यायाधीश (३) श्रीमती के. डी. शिरभाते यांनी या गुन्ह्यातील सर्व आरोपींचा जामिन अर्ज नामंजूर केला.

या प्रकरणात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील प्रदिपसिंग राजपूत यांनी काम पाहिले तर आरोपीच्या वतीने अॅड. डब्ल्यू. बी. खान, अॅड. एच. एच. बडेखान यांनी काम पाहिले.