🔶 शिवगर्जना महानाट्याचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार
🔶शिवगर्जना महानाट्याची तयारी पूर्ण.... प्रतिदिन दहा हजार नागरिक महानाट्याचा लाभ घेणार
🔶शिवगर्जना हे एकच नाटक असून तीन दिवस दाखवण्यात येणार, 250 कलाकारांचा सहभाग
🔶जिल्ह्यात शिवगर्जना महानाट्याचे 10 ते 12 फेब्रुवारी दरम्यान हरिभाई देवकरण प्रशालाच्या प्रांगणात आयोजन
🔶महानाट्याची वेळ सायंकाळी 7 ते रात्री 10, प्रवेश विनामूल्य
सोलापूर : राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित महानाट्य सादर केले जात आहेत. त्याच अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यात दिनांक दहा ते बारा फेब्रुवारी 2024 दरम्यान शिवगर्जना हे महानाट्य सादर केले जाणार असून उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते दिनांक 10 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजता होणार आहे. तरी सोलापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त शिवप्रेमी नागरिकांनी महानाट्य पाहण्यास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
शिवगर्जना महानाट्याची तयारी पूर्ण झालेली असून जिल्हा प्रशासनाच्या वतीने महानाट्य सादर करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या देण्यात आलेल्या आहेत. जवळपास अडीचशे कलाकार यात सहभागी होणार असून घोडे, उंट व हत्ती हे प्राणी यात आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास महानाट्याच्या माध्यमातून सादर होणार असल्याने सोलापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त शिवप्रेमी नागरिकांनी या महानाट्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
तसेच हरिभाई देवकरण प्रशालाच्या प्रांगणात एकाच महानाट्याचे तीन दिवस प्रयोग सादर केले जाणार असून सायंकाळी सात ते रात्री दहा पर्यंत हे नाट्य सुरू राहणार आहे. यामध्ये बाराव्या शतकापासून ते शिवजन्म व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मापासून ते त्यांच्या राज्याभिषेकापर्यंतचे सादरीकरण महानाट्याच्या माध्यमातून केले जाणार आहे. महानाट्य पाहण्यासाठी नागरिकांना प्रवेश विनामूल्य आहे.