आदिवासी धनगर साहित्य संमेलनातील परिसंवाद
सोलापूर : पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांची न्याय व्यवस्था आदर्श होती. सर्व जाती धर्माच्या लोकांना त्यांनी न्याय दिला. त्यांच्या विचारांचे आचरण महिलांनी केले पाहिजे. अंधाराकडे नेणाऱ्या परंपरा महिलांनी सोडल्या पाहिजेत, असे प्रतिपादन प्रा.डॉ. संगीता पैकेकरी (माढा) यांनी केले.
श्री संत सद्गुरू बाळुमामा ट्रस्ट, बेलाटी आयोजित पाचवे आदिवासी धनगर साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी " पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि आजच्या महिला" या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य मीरा शेंडगे या होत्या.
यावेळी विचार मंचावर संमेलनाचे अध्यक्ष माजी आ. अॅड. रामहरी रुपनवर, संस्थापक प्राचार्य डॉ. अभिमन्यू टकले, स्वागत अध्यक्ष श्रीराम पाटील, माजी संमेलनाध्यक्ष प्राचार्य आर. एस. चोपडे, संभाजी सुळ, सिद्धारूढ बेडगनुर, उज्ज्वलकुमार माने, बिसलसिद्ध काळे, देवेंद्र मदने , कुंडलिक आलदर, उषा देशमुख, ज्ञानेश्वर ढोमणे आदींसह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रा.डॉ. संगीता पैकेकरी पुढे म्हणाल्या, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा आदर्श घेऊन महिलांनी मुलांना शिक्षण दिले पाहिजे. सर्व समाजाने संघटित झाले पाहिजे. महिला व नव्या पिढीने होळकर यांचे चरित्र वाचले पाहिजे. त्याप्रमाणे आदर्श घेऊन आचरण करावे, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
प्राचार्य मीरा शेंडगे म्हणाल्या, प्रगती करण्याची संधी सर्वांना संविधानाने दिली. राजकारण, समाजकारण व विविध क्षेत्रातील लोकांसाठी पुण्यश्लोक आहिल्यादेवी यांचे कार्य आदर्शवत आहे. जाती-धर्मावरून होणारे राजकारण हे योग्य नाही, असेही त्यांनी यावेळी म्हटले.