सोलापूर : श्री सिद्धेश्वर देवस्थान संचलित, सिद्धेश्वर प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ नुकत्याच अयोध्या येथे पार पडलेल्या श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त प्रशालेच्या विद्यार्थ्यांनीच नव्हे तर संबंध सभागृहातील उपस्थित सर्वांनीच उभे राहून हात जोडून ‘श्रीराम नामाचा ’ जयघोष देत श्रीरामांना भक्तीभावाने मानवंदना दिली. समारंभाच्या अध्यक्षस्थानी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे ज्येष्ठ विश्वस्त तथा ऑफिस सेक्रेटरी नीलकंठप्पा कोनापुरे हे होते.
यावेळी, प्रमुख पाहुणे म्हणून कस्तुरबाई शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य मा.डॉ.अश्विन बोंदार्डे हे उपस्थित होते. त्याचबरोबर श्री सिद्धेश्वर देवस्थानचे ज्येष्ठ सन्माननीय विश्वस्त विश्वनाथ लब्बा, सिद्धेश्वर बमणी, शिवकुमार पाटील, मुख्याध्यापक संतोष पाटील, पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा सौ.ज्योती स्वामी, यंदाचे आदर्श विद्यार्थी चि. इरेश मणुरे, चि.यशांक सुरवसे तसेच कु. साक्षी कुर्ले आदी उपस्थित होते.
समारंभाच्या सुरुवातीला दीपप्रज्वलनाच्या वेळी सहशिक्षिका सौ. तृप्ती कुलकर्णी व श्रीमती मिनाक्षी हनगंडी यांनी श्री सिद्धरामेश्वरांचे वचन गायन करून वातावरण निर्मिती केली. प्रशालेचे उपमुख्याद्यापक राजकुमार उंबरजे यांनी मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. पर्यवेक्षक श्री.विनोद बिराजदार यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला.
वार्षिक स्नेहसंमेलन सोहळ्यातील उपस्थित मान्यवरांच्या सत्कारानंतर प्रशालेतील आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त पक्षीमित्र व पर्यावरण प्रेमी शिवानंद हिरेमठ व वार्षिक स्नेहसंमेलनाचे कार्याध्यक्ष श्री मल्लिकार्जुन तीर्थकर आणि एनसीसी ऑफिसरपदी निवड झालेले संजयकुमार कोरे यांचाही गौरव करण्यात आला.
तद्नंतर एस.एस.सी. बोर्डातील व प्रशालेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच कला,क्रीडा व विज्ञान क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर झेप घेतलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला.याप्रसंगी स्नेहसंमेलनाच्या उपकार्याध्यक्षा सौ.रुपाली स्वामी यांनी शालेय अहवाल सादर केला.यावेळी सभागृहात ppt च्या माध्यमातून प्रशालेत सादर होणारे अनेक नाविन्यपूर्ण व कौतुकास्पद उपक्रमांची माहितीदेखील सर्व पालकांसमोर सादर करण्यात आली.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ.बोंदार्डे यांनी, "आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात संस्कारक्षम विद्यार्थी प्रत्येक घरातून निर्माण करणे ही काळाची गरज आहे." असे मत व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगतातून कोनापुरे अप्पानी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करत शाळेने राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेणाऱ्या विद्यार्थ्यांना घडवले, याबाबत समाधान व्यक्त करत यापुढेही शाळेची प्रगती उत्तरोत्तर घडत राहो, अशी भावना व्यक्त केली.
आजच्या स्नेहसंमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे श्रीरामांना मानवंदना देत हनुमान गीत, गणेश गीत व शिवशंकर गीत यासारख्या गीतातून धार्मिक वातावरणाची निर्मिती केली तर शिवरायांचा पोवाडा, गोंधळ गीत, पारंपारिक गीत, लेझी डान्स, हिंदी-तेलगू रिमिक्स तसेच कन्नड माध्यमांच्या विद्यार्थिनींनी सुंदर लोकनृत्य सादर केले. सोशल मीडियाचे दुष्परिणाम दाखवणाऱ्या गीतांचे सादरीकरण करत सभागृहात प्रचंड संख्येने उपस्थित असलेल्या पालकांची मने जिंकली.
याप्रसंगी बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचे यादी वाचन सहशिक्षिका सौ.स्नेहलता सर्जे व सौ. प्रमोदिनी स्वामी यांनी केले तर सर्व गाण्यांचे उत्कृष्ट निवेदन काशिनाथ आकाशे व सौ.सर्जे यांनी केले. या संपूर्ण समारंभाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख रविंद्र कबाडे यांनी केले तर स्नेहसंमेलनाचे कार्याध्यक्ष मल्लिकार्जुन तीर्थकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
श्री सिद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष तथा शालेय शिक्षण समितीचे चेअरमन धर्मराज काडादी,ज्येष्ठ सदस्य गंगाधर कुमठेकर, प्रशालेचे पालक सदस्य भीमाशंकर पटणे तसेच मलिकार्जुन कळके, ऋतुराज माळगे व प्रा. डॉ.राजशेखर येळीकर, प्रा. सी. बी. नाडगौडा आदी मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या वार्षिक स्नेहसंमेलनास सुमारे दीड ते दोन हजार पालक उपस्थित होते.