सन २०२४ मध्ये महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा या दोन महत्त्वाच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात मतदार याद्यांच्या अद्ययावतीकरणासाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम तसेच घरोघरी सर्वेक्षणाची मोहीम राबवण्यात आली होती. या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात राबवण्यात आलेल्या मोहिमांमुळे अंतिम मतदार यादीत नवमतदारांचा टक्का लक्षणीय वाढला असल्याची माहिती सोलापूरचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी, कुमार आशीर्वाद यांनी दिली. अंतिम मतदार यादीच्या प्रकाशनानिमित्ताने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषेदेत ते बोलत होते.
निवडणुका पारदर्शक आणि न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण तसेच शुद्धीकरण अत्यंत महत्त्वपूर्ण असते. यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून दरवर्षी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबवला जातो. २७ ऑक्टोबर २०२३ रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर आणि मतदार नोदणी कार्यालयामध्ये प्रारूप यादी प्रकाशित करून २०२४ च्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला होता. सदर कार्यक्रम २७ ऑक्टोबर ते २३ जानेवारी २०२४ या कालावधीत राबवला गेला.
या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत ऑक्टोबर २०२३ च्या प्रारूप मतदार यादीत ३६,३३,०७२ मतदारांची नोंद होती. SSR २०२४ मध्ये १,५६,९५० मयत, कायम स्वरूपी स्थलांतरित व दुबार मतदारांची वगळणी करण्यात आली, असून १,०२,८५० मतदारांची वाढ झालेलीआहे. त्यामुळे अंतिम मतदार यादीमध्ये मतदारांची संख्या ३५,७८,९७२ इतकी झालेली आहे. त्यानुसार ४९,२२० पुरुष मतदाराची, ५३,६०६ श्री मतदारांची आणि २४ तृतीयपंथी मतदारांची निव्वळ वाढ झालेली आहे. महिला बचत गट, अंगणवाडी सेविका, गृहनिर्माण सोसायट्या यांच्या सहकार्यामुळे यंदा महिलांच्या मतदार नोंदणीत लक्षणीय वाढ झालेली दिसून येते. त्यामुळे मतदार यादीतील श्री- पुरुष गुणोत्तर ९२३ वरून ९३१ इतके झाले आहे.
या पुनरीक्षण कार्यक्रमामध्ये १८ ते १९ या वयोगटामध्ये २८,८५० मतदारांची नव्याने भर पडली आहे, तसेच २० ते २९ या वयोगटात ३५,२१० मतदारांची वाढ झालेली आहे. प्रारूप यादीत १८ ते १९ या वयोगटाची मतदार संख्या १५८७६ (०.३४ टक्के) होती, ती जानेवारीच्या अंतिम मतदार यादीत ४४७२६ (१.२५ टक्के) इतकी झालेली आहे. तर २० ते २९ वयोगटाची प्रारूप यादीतील मतदार संख्या ६,५५,०४३ (१३.८८ टक्के) होती, ती अंतिम यादीत ६,९०,२५३ (१९.२९ टक्के) इतकी झालेली आहे. विविध सामाजिक संस्था, महाविद्यालये यांनी राबवलेल्या मतदार नोंदणी शिबिरांमुळे या वयोगटाच्या टक्केवारीत वाढ झालेली दिसून येते. लोकसभा व विधानसभा निवडणुक २०२४ च्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या अचूक व परिपूर्ण असण्यावर भारत निवडणूक आयोगाचा भर आहे. त्यानुसार विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमापूर्वी जुलै, २०२३ ते ऑगस्ट, २०२३ या कालावधीत घरोघरी सर्वेक्षणाची मोहीम राबवण्यात आली होती.
सदर सर्वेक्षणात आढळलेल्या मयत मतदार, कायमस्वरूपी स्थलांतरित मतदार, तसेच दुबार मतदार यांची नावे मतदार यादीतून वगळण्याची कार्यवाही पुनरीक्षणपूर्व कालावधीत तसेच विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कालावधीत पूर्ण करण्यात आली. त्यानुसार ७२,८०६ मयत मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली. त्यापैकी ऐशीपेक्षा अधिक वय असलेले ३९,५४१ मतदार मयत झाले असल्याचे निदर्शनास आल्यामुळे त्यांची नावेही वगळण्यात आलेली आहेत. त्याचप्रमाणे मतदार याद्यांमध्ये ६०,९६७ एकसारखे फोटो असलेले मतदार (फोटो सिमिलर एन्ट्रीज PSE) असल्याचे निदर्शनास आले, त्यांची सखोल तपासणी करून विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कालावधीत १५,३६३ मतदारांच्या नावांची वगळणी करण्यात आली आहे. तसेच मतदार यादीत नाव व इतर काही तपशील समान असलेले (डेमोग्राफिकल सिमिलर एन्ट्रीज DSE) ९,९४४ मतदार आढळून आले. त्यांची सखोल तपासणी करून ३,१६५ मतदारांची नावे वगळण्यात आलेली आहेत. ही वगळणी प्रक्रिया मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत संबंधित मतदारांच्या गृहभेटी घेऊन, स्पीड पोस्टाने नोटिसा पाठवून, तसेच पूर्ण तपासणी-अंती कायदेशीररीत्या वगळणी प्रक्रिया करण्यात आलेली आहे. नाव वगळणीच्या या प्रक्रियेमुळे मतदार यादीतील अनावश्यक फुगवटा नाहीसा होऊन आता ती अधिक परिपूर्ण झालेली आहे.
मतदार यादी जितकी सर्वसमावेशक तितकी वंचित समाजघटक लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे यंदाच्या पुनरीक्षण कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे, भटक्या व विमुक्त जमातीच्या मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिरे आयोजित करण्यात आली होती. या शिबिरांमध्ये मतदार नोंदणीबरोबरच आधारकार्ड, रेशनकार्ड, जातीचा दाखला यांचेही या जमातीतील लोकांना वाटप करण्यात आले. सोलापूर जिल्ह्यामध्ये मतदार संघ निहाय ५९ शिबिरे घेण्यात आली होती. त्यामध्ये भटक्या व विमुक्त जमातीच्या एकूण १,९३४ लोकांची मतदार नोंदणी करण्यात आली असून ९३१ व्यक्तीना जातीचे दाखले व ४९७ रेशनकार्ड चे वाटप करण्यात आले. सदर उपक्रमामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी, कुमार आशीर्वाद यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाला आहे.
यंदाच्या पुनरीक्षण कार्यक्रमामध्ये मतदार नोंदणीसाठी १ जानेवारी या नेहमीच्या अर्हता दिनांकासोबतच १ एप्रिल, १ जुलै आणि १ ऑक्टोबर या बहु-अर्हता तारखा ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे ऑक्टोबर २०२४ पर्यंत १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या युवांनाही या मोहिमेत आगाऊ किवा पूर्वनोंदणी (Advance Registration) करता आली. पूर्वनोंदणीचे एकूण १८,३४३ अर्ज (१ एप्रिल - ४,६५८, १ जुलै -७,१११, १ ऑक्टोबर ६,५७४) प्राप्त झालेले आहेत. त्या-त्या तिमाहीच्या कालावधीत १८ वर्षे पूर्ण होणाऱ्या अर्जदारांच्या अर्जावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे पूर्वनोंदणी केलेल्या युवांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. मात्र अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतरही मतदार नोंदणीची निरंतर अद्यतन (Continuous Updating) प्रक्रिया सुरू असल्यामुळे अद्याप नाव नोंदणी न केलेल्या युवांना मतदार नोंदणीची अजूनही संधी आहे.
दिनांक २३ जानेवारी रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर आणि मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. मतदारांनी 'मतदाता सेवा पोर्टल या संकेतस्थळावर (https://electoralsearch.eci.gov.in/) जाऊन मतदार यादीत आपले नाव तपासावे आणि सर्व तपशील योग्य आहेत का हे पाहावे. सोबतच मतदान केंद्र सुद्धा तपासून घ्यावे, जेणेकरून ऐन मतदानाच्या दिवशी गैरसोय होणार नाही. तसेच मतदार यादीत नाव नसलेल्या नागरिकांनी सहा क्रमांकाचा अर्ज भरून आपला मताधिकार सुनिश्चित करावा, सर्व राजकीय पक्षांनाही त्यांनी आवाहन केले आहे की, आपापल्या पक्षामार्फत मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींच्या नियुक्त्या करून त्यांच्या माध्यमातून मतदारांना यादीत नाव तपासण्यास आणि नावे नसलेल्यांना मतदार नोंदणीस साहाय्य करावे.
तसेच, अद्याप निवडणूक मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट नसलेल्या सर्व नागरिकांनी आपले नाव मतदार यादीमध्ये नोंदवून घ्यावे. मतदार नोंदणी कार्यालयात प्रत्यक्ष मतदार नोंदणी करता येईल. तसेच 'मतदाता सेवा पोर्टल' आणि 'वोटर हेल्पलाइन अॅप यांवर ऑनलाइन नाव नोंदणीची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे. असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी, सोलापूर कुमार आशीर्वाद यांनी केले.