Type Here to Get Search Results !

साहित्याचे मूळ शोधून लेखन करा: इंद्रजीत भालेराव

 


सोलापूर विद्यापीठात नियतकालिक स्पर्धेचे बक्षीस वितरण

सोलापूर : साहित्याचे मूळ शोधून कवी व लेखकांनी लेखन केले पाहिजे. यामुळे साहित्याचे सत्व सापडेल आणि साहित्य समृद्ध देखील बनेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी व साहित्यिक प्रा. इंद्रजीत भालेराव यांनी केले.

मंगळवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात विद्यार्थी विकास विभागाकडून घेण्यात आलेल्या संलग्नित महाविद्यालयातील महाविद्यालयांच्या नियतकालिका स्पर्धेचे बक्षीस वितरण प्रा. इंद्रजीत भालेराव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा हे होते. 


यावेळी व्यासपीठावर कुलसचिव योगिनी घारे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे यांची उपस्थिती होती. मान्यवरांचा परिचय प्रा. ममता बोल्ली यांनी करून दिला. कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. 

प्रा. इंद्रजीत भालेराव म्हणाले की, महाविद्यालयस्तरावर प्रकाशित करण्यात येणाऱ्या वार्षिक नियतकालिकांमधून लेखन करून अनेक कवी व लेखक आज घडले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना एक संधी मिळून लेखन कौशल्याला खऱ्या अर्थाने चालना मिळते. दर्जेदार नियतकालिका आज प्रकाशित होत आहेत, ही आनंदाची बाब आहे. मी देखील नियतकालिकांमधूनच लिखाणाला सुरुवात केली आहे. 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून देखील नियतकालिकांची स्पर्धा घेऊन कवी व लेखकांचा सन्मान केला जातो, ही खरंच खूप कौतुक व अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी प्रा. भालेराव यांनी बाप, काट्याकुट्यात तुडवीत रस्ता, जन्म आदी विविध कविता व ओव्या सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. 


प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा म्हणाले की, आज कला व वाणिज्य शाखेबरोबरच विज्ञान शाखेतील विद्यार्थी, शिक्षक व तज्ञ लोकांनी विविध लेखन करून साहित्य क्षेत्रात योगदान देत आहेत. यात प्रामुख्याने जयंत नारळीकर यासारख्या थोर तज्ञांचा समावेश होतो. विद्यापीठाकडून संलग्नित महाविद्यालयात आयोजित नियतकालिका स्पर्धेत सर्व विद्याशाखेतील विद्यार्थ्यांचा सहभाग असतो. यात लेखन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून प्र-कुलगुरू डॉ. दामा यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या. 

या स्पर्धेत ३२ महाविद्यालयांनी सहभाग घेतला. ११२ हून अधिक विद्यार्थ्यांना यावेळी पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेत वालचंद कला व शास्त्र महाविद्यालय प्रथम, हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स द्वितीय, डी. बी. एफ. दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय  तृतीय तर संगमेश्वर आणि सांगोला कॉलेजला उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. केदारनाथ काळवणे व सूत्रसंचालन डॉ. यशपाल खेडकर यांनी केले तर आभार डॉ. राजेंद्र वडजे यांनी मानले.


....फोटो ओळी....

सोलापूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात नियतकालिका स्पर्धेच्या बक्षीस वितरणाप्रसंगी ज्येष्ठ कवी, साहित्यिक प्रा. इंद्रजीत भालेराव, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे आदी.