जल्लोषात संपन्न झाला आयोध्येचा आनंदोत्सव सोहळा
सोलापूर : अयोध्येतील श्री रामरायांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने सोलापुरातील अक्कलकोट रोड स्थित हेरिटेज मणिधारी एम्पायर मध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
या वेळी राम, लक्ष्मण, भरत, सीता, हनुमंत, शबरी, वानरसेनेच्या छबीतील बालकांनी (अनुक्रमे सर्वेश बिराजदार, अक्षय कुलकर्णी, शिवम शिवगुंडे, प्रचिती मुळजे, श्रेयस जाधव, प्रगती निंबाळे, रोहन कुलकर्णी, राजीव शिवगुंडे) विभूषित केलेल्या रामायणातील आदर्श पात्रांची बग्गी-रथ मिरवणूक काढण्यात आली. सदर शोभायात्रेला ज्येष्ठ मंडळींनी गुलाबपुष्पांच्या वर्षावात मार्गस्थ केले.
अपुर्व उत्साह, जल्लोष, आतषबाजी, एलईडी स्क्रीन, दीपोत्सव, त्या जोडीला वैशाली अघोर यांनी केलेले श्रीरामाचे चरित्रकथन आणि तृप्तीची अनुभूती देणारा महाप्रसाद.
अशा या भरगच्च कार्यक्रमांनी संपूर्ण संकुल भक्तीमय बनले होते. विशेष म्हणजे, बेंजोवर थिरकणारी तरुणाई भक्तीगीतावर ताल धरताना पाहून सारेच हरखून जात होते.
समर्पण भाव, वर्गणी, नाव न सांगण्याच्या अटीवरची देणगी, 'कमी पडले तर आम्ही आहोत' असा दिलासा देणारे दानशूर, झाडलोट, मंदिर स्वच्छता, डिजिटल बॅनर, ध्वज- पताकांनी सजावट करणारे कार्यकर्ते, घर- अंगण अन यात्रामार्ग सडा- रांगोळ्यांनी सुशोभित करणार्या महिला- भगीनी अशा प्रकारे संकुलातील आबालवृद्ध मंडळी जात-पात, पक्ष इ. भेद विसरून अगदी तन मन धनाने, सेवाभावाने, एकदिलाने झटली.