सोलापूर : येथील देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेतर्फे आयोजित तीन दिवसीय दासबोध मार्गदर्शन वर्गाची महाआरतीने उत्साहात सांगता झाली.
सेवासदन प्रशालेतील सभागृहात झालेल्या या वर्गात सुमारे शंभर साधकांनी सहभाग घेतला. मुंबईचे कार्पोरेट किर्तनकार व निरुपणकार समीर लिमये यांनी तीन दिवस साधकांना मनाचे श्लोक व दासबोध वाचनाची पध्दत, त्यातील समर्थांना अपेक्षित अर्थ व त्यातून साधकाला होणारे समाधान याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले. दरम्यान या वर्गाची सुरुवात सेवासदन संस्थेच्या सोलापूर शाखाध्यक्षा प्रा. शिला मिस्त्री यांच्या हस्ते दीपप्रज्वलनासह 'श्रीराम जय राम जय जय राम' च्या नामघोषातील ग्रंथदिडीने झाली.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रा.डाॅ. श्रीकांत येळेगावकर, प्रमुख कार्यवाह श्याम जोशी, उपाध्यक्ष दत्तात्रय आराध्ये, खजिनदार सतीश पाटील, सदस्य शंकर कुलकर्णी, योजनगंधा जोशी,संपदा पानसे, वेदमूर्ती योगेश जोशी उपस्थित होते. वर्गाच्या दुसऱ्या दिवशी निरुपणकार समीर लिमये यांनी संपादित केलेल्या मनाचे श्लोक पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष प्रा.डाॅ. श्रीकांत येळेगावकर, प्रा.प्रसाद कुंटे व प्रा.प्राची कुंटे यांच्या हस्ते झाले. समारोपावेळी दासबोध ग्रंथाची महाआरती करण्यात आली.
यावेळी वर्गासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. दासनवमीला दासबोधाचे सामुदायिक पारायण सोहळा करण्याचा निर्धार यावेळी सहभागी साधकांनी व्यक्त केला. ह.भ.प.अपर्णा सहस्त्रबुध्दे यांनी सूत्रसंचालन केले. ह.भ.प.श्याम जोशी यांनी आभार मानले.
फोटो ओळी :
सोलापूर : देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्था आयोजित दासबोध मार्गदर्शन वर्गाच्या समारोपावेळी निरुपणकार समीर लिमये यांचा सन्मान करताना प्रा.डाॅ. श्रीकांत येळेगावकर, श्याम जोशी, सतीश पाटील, योगेश जोशी, शंकर कुलकर्णी, योजनगंधा जोशी, अपर्णा सहस्त्रबुध्दे व प्रा.शीला मिस्त्री छायाचित्रात दिसत आहेत.