पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात अविष्कार महोत्सवाचं उद्धाटन
सोलापूर : नौदल, भूदल आणि वायू दलाचे स्वदेशी तंत्रज्ञान, संशोधन आणि संरक्षण शस्त्रास्त्र निर्मिती करण्यात भारत अग्रेसर आहे, युध्द तंत्रज्ञानात भारत समर्थ व सशक्त सक्षम आहे, हा संदेश जगात पोहोचत आहे, संरक्षण क्षेत्राबरोबरच विकासात आत्मनिर्भरतेच्या दिशेने भारताची वाटचाल सुरु आहे. येणाऱ्या २५ वर्षात भारत हा अग्रेसर देश असेल.असे प्रतिपादन डीआरडीओचे माजी संचालक डॉ. काशिनाथ देवधर यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीने आयोजीत केलेल्या अविष्कार संशोधन महोत्सवाच्या उद्धाटन प्रसंगी डॉ. देवधर बोलत होते. यावेळी महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. प्रकाश महानवर उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर विद्यापीठाचे प्र. कुलगुरु लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, अविष्कारचे समन्वयक डॉ. विनायक धुळप, डॉ. अशोक शिंदे, डॉ. अंजना लावंड उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. काशिनाथ देवधर म्हणाले, माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली देशाने स्वरक्षण क्षेत्रात मोठी प्रगती केली. देशाला शस्त्र अस्त्र आयात करावी लागत होती, आज देश स्वयंपुर्णतेकडे वाटचाल करत आहे. एवढेच नव्हे तर जगातील इतर राष्ट्रांना संरक्षणासाठी शस्त्रास्त्र निर्यात करत आहे. पोखरणला अणू स्फोट करून माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांनी जय जवान, जय किसान याबरोबरच जय विज्ञानचा नारा दिला आणि अविष्कार कार्यक्रमाचा पाया घातल्याचे डॉ. देवधर यांनी नमूद केले.
यावेळी सोलापूर महानगरपालिकेच्या डॉ. कोटणीस स्मारकातील २५४५ पुस्तके विद्यापीठाच्या ग्रंथालयाला डॉ. सतिश वळसंगकर यांच्या पुढाकाराने पुस्तके दिल्याबद्दल डॉ. काशिनाथ देवधर आणि कुलगुरु प्रा. प्रकाश महानवर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष कुलगुरु प्रा. प्रकाश महानवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, पारंपारिक चौकटीच्या बाहेर जावून नवनवीन संशोधनाच्या संकल्पना ग्रामिण भागातच आहेत आणि या संकल्पना प्रत्यक्षात उतरवुन नवनवीन उद्योग उभारले जात आहे. तसेच महिला या प्रगल्भ, नव संशोधन आणि पुढाकार घेण्यात आघाडीवर आहेत. त्यामुळेच अविष्कार कार्यक्रमात विद्यार्थ्यांपेक्षा विद्यार्थींनींनी अधिक सहभाग घेतल्याचे कुल प्रा. महानवर यांनी नमुद केले.
यावेळी अविष्कार स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे कुलगुरु प्रा. प्रकाश महानवर यांनी अभिनंदन करुन नाशिक येंथे होणार्या राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ महत्वपूर्ण सहभाग नोंदवेल असेही स्पष्ट केले.
अविष्कार कार्यक्रमासाठी पुण्यश्लोक अहिल्योदवी होळकर सोलापूर विद्यापीठ परिसरातील ११ संकुल आणि संलग्न असलेल्या १०४ महाविद्यालयातुन ४५७ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यामध्ये २०३ मुले आणि २५४ मुलींचा सहभाग आहे. अविष्कार मध्ये एकुण ३३८ संशोधन पोस्टर आणि १२१ संशोधन प्रकल्प सादर करण्यात आले आहेत. कार्यक्रमाच्या प्रारंभी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. आणि दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्धाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
डॉ. हेडगेवार रक्तपेढीच्या वतीने अविष्कार कार्यक्रमाच्या ठिकाणी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्धाटन काशिनाथ देवधर, कुलगुरु डॉ. प्रकाश महानवर आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अविष्कारचे समन्वयक डॉ. विनायक धुळप यांनी केले. तर आभार कुलसचिव योगिनी घारे यांनी मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. तेजस्विनी कांबळे व ममता बोल्ली यांनी केले.