'म्हारी छोरियां छोरोंसे कम हैं के? हा दंगल चित्रपटातील संवाद प्रत्यक्षात; देगांवच्या कन्येची उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला भरारी
सोलापूर : 'म्हारी छोरियां छोरोंसे कम हैं के? हा दंगल चित्रपटातील आमीर खानचा डायलॉग प्रत्यक्षात खरा करून दाखविला आहे, देगांवच्या एका कन्येने व तिच्या पित्याने. एकामागून एक तीन मुली झाल्यानंतर तिच्या वडिलांना जवळच्याच लोकांकडून खूप बोलणे खावे लागले. मात्र त्या मुलींच्या पित्याने आपल्या मुलीला इतके चांगले शिक्षण दिले की ‘हम भी किसीसे कम नही’ हे सिध्द करत व वडिलांचा विश्वास सार्थ ठरवत त्या मुलीने अमेरिकेतील एका विद्यापीठाची उच्च शिक्षणासाठी तब्बल १८ लाखांची शिष्यवृत्ती मिळविली आहे.
उत्तर सोलापूर तालुक्यातील मूळची देगाव येथील अनसूया ! मात्र ती हल्ली मुंबई येथे राहात व शिक्षण घेत असलेल्या अनसूया नवनाथ वाघमारे हिने आपल्या जिद्द व चिकाटीच्या जोरावर ही उंच भरारी घेतली आहे.
अनसूया वाघमारे हिचे पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण सीबीएसई बोर्डाच्या माध्यमातून अॅटोमीक एनर्जी सेंट्रल स्कूल, अणुशक्ती नगर मुंबई येथून झाले. तिने दहावीला ८७ टक्के तर बारावीला ९२ टक्के गुण मिळविले असून आता तिला बॅचलर इन कॉम्प्युटर सायन्स या पुढील पदवीच्या शिक्षणासाठी युनिव्हर्सिटी ऑफ आयडाहो या अमेरिकेतील विद्यापीठाची १५ ते १८ लाखांची शिष्यवृत्ती मिळाली आहे.
ही शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी आयडीबी या संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या ऑफलाइन पात्रता परीक्षेत अनसूया हिने आय. इ. एल. टी. एस. परीक्षेमध्ये नऊपैकी सात बँड मिळविले तर एस. ए. टी. परीक्षेत १६०० पैकी ११०० गुण मिळविले. तसेच ४५ मिनिटे चाललेल्या ऑनलाइन मुलाखतीत अपेक्षित उत्तरे दिली. यामुळे ती शिष्यवृत्ती मिळविण्यास पात्र ठरली आहे. आता ती चार वर्षे अमेरिकेतच स्थायिक होऊन आपले शिक्षण पूर्ण करणार आहे.
आपल्या पुढील शिक्षणासाठी ती जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अमेरिकेला रवाना होणार आहे. त्याचबरोबर शिक्षण पुर्ण केल्यानंतर परत भारतात आल्यावर सॉफ्टवेअर डेव्हलपर बनून देशसेवा करणार असल्याचे तिने सांगितले. तसेच आपल्या या यशात शिक्षकांसह आई नीता, आजोबा दत्तात्रय, आजी पद्मिनी वाघमारे तसेच आजी तेजा घंटे व कल्पना घंटे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे तिने सांगितले.
वाहनचालक वडिलांनी दिलं प्रोत्साहन
अनसूया हिचे वडील नवनाथ दत्तात्रय वाघमारे हे भाभा अणुसंशोधन केंद्र, मुंबई येथे ग्रेड एक वाहनचालक पदावर कार्यरत आहेत. त्यांनीच तिला उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन व पाठिंबा दिला. आपल्या कन्येच्या या भरारीविषयी ते म्हणाले की, आपण स्वत: जिल्हा परीषदेच्या प्राथमिक शाळेत शिकलो, मात्र आपल्याला शिक्षण किती महत्वाचे आहे, याची जाणीव असल्याने आपण मुलीच्या शिक्षणाला प्राधान्य दिले. मुलीनेही त्याचे चीज केले, याचा आपल्याला अभिमान आहे. शिवाय आपल्याला तिन्ही मुलीच असल्याने अनेकांकडून नको, त्या गोष्टी ऐकाव्या लागल्या होत्या. त्यामुळे आपण मुलींना काहीही झाले तरी उच्च शिक्षण देण्याचा चंगच तेव्हापासून बांधला होता. आता मोठ्या मुलीने अपेक्षेप्रमाणे भरारी घेतली आहे, याचे मोठे समाधान आहे. मी यानिमित्ताने एकच सांगेन मुलगा-मुलगी असा भेदभाव करणे चुकीचे आहे. कारण मुलीदेखील मुलांपेक्षा कोठेही कमी नाहीत, हेच खरे आहे.