Type Here to Get Search Results !

कोविड १९ मध्ये मयत अंगणवाडी सेविकांच्या कुटुंबातील सदस्यांना त्यांच्या जागेवर द्यावी नियुक्ती : उपोषण सुरू


सोलापूर : कोविड १९ च्या महासंकटात आजाराला बळी पडलेल्या अंगणवाडी सेविकांच्या कुटुंबातील सदस्यांना त्यांच्या जागेवर नियुक्ती देण्याच्या मागणीसाठी सासुरे येथील तेजस्विनी रमाकांत गुरव यांनी गुरुवारी सकाळपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर अन्न-पाणी त्याग उपोषण सुरू केलं आहे.

जागतिक महामारी म्हणून गणल्या गेलेल्या कोविड काळात गावामध्ये कोरोना आजाराला बळी पडलेल्या अंगणवाडी सेविका व कर्मचारी यांच्या कुटुंबातील व्यक्तींना नियुक्ती देण्याच्या मागणीसाठी तेजस्विनी गुरव यांनी सोलापूर सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदने दिली, उपोषणही केले, मात्र आश्वासनाच्या पलीकडे त्यांच्या पदरी काहीच आले नाही.

कोविड काळात अनेक कर्मचाऱ्यांना आपले कर्तव्य बजावत असताना मृत्यूला सामोरे जावे लागले आहे. त्यातच बार्शी तालुक्यातील सासुरे येथील उपोषणकर्त्या तेजस्विनी गुरव यांच्या आई अंगणवाडी सेविका सौ. कल्पना रमाकांत गुरव मयत झाल्या होत्या. त्यांच्या जागेवर गुरव कुटुंबातील त्या पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता पूर्ण करीत आहे, अशा व्यक्तीस वयामध्ये सवलत देऊन नियुक्ती करावी, या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केले असल्याचे तेजस्विनी गुरव यांनी सांगितले.