व्यापाऱ्याची लाखोंची फसवणूक; पुणेरी ठकसेन गजाआड

shivrajya patra
सोलापूर : येथील अंत्रोळीकर नगर गुरुद्वाराजवळ एका संशयित इसमासंबंधी मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार गुन्हे शाखेच्या पथकाने, त्यास ताब्यात घेऊन त्याची झाडाझडती घेतली असता, त्याने तोतयागिरी करून व्यापाऱ्यांची फसवणूक केल्याची कबुली दिली. सरबजितसिंग हरजितसिंग होरा (वय - ३५ वर्षे, रा.- ए ४०६, अल्कसा सोसायटी, देसाई डोळ्याचा दवाखाना जवळ मोहमदवाडी, हडपसर, पुणे) असं त्या ठकसेनाचं नांव आहे. त्याच्या ताब्यातून सुमारे ८,९१,०७५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.

पूर्व मंगळवार पेठेतील व्यापारी प्रकाश भारत भूषण आरसीद यांना ३० ऑक्टोबर रोजी अज्ञाताने, भ्रमणध्वनीवर कॉल करून तो सोलापूर येथील गुरुद्वाराचा सेवेकरी असल्याचे सांगून, त्यास धार्मिक कार्यासाठी, जेमिनी सनफ्लावर तेलाचे प्रत्येकी १५ लीटरचे २५ डब्बे व नेचर फ्रेश चक्की आट्याच्या प्रत्येकी ३० किलो वजनाच्या ४० बॅग पाहिजे, असल्याचे सांगितले. त्यावेळी, प्रकाश आरसीद यांनी ऑर्डरप्रमाणे तेल व चक्की आटा हा, संबंधित ठिकाणी पाठवून दिला. त्यावेळी संबंधीत अज्ञात इसमाने, प्रकाश आरसीद यांना चेक दिला, मात्र तो धनादेश वटला नाही. 

त्यावेळी, प्रकाश आरसीद यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार भा.द.वि.क. ४२०, ४१९, ४०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यापूर्वी ०२ मार्च २०२३ रोजी प्रकाश भारतभुषण आरसीद, (रा. -२३०, पूर्व मंगळवार पेठ, सोलापूर) यांना एका अज्ञाताने मोबाईलवरुन संपर्क करुन, तो सोलापूर येथील गुरुद्वाराचा सेवेकरी असल्याचे सांगून, त्यास धार्मिक कार्यासाठी, किर्ती गोल्ड सोयाबीन तेलाचे १५० बॉक्स पाहिजे असल्याचे सांगत, प्रकाश आरसीद यांनी, संबंधीत इसमास सोयाबीन तेलाचे १५० बॉक्स पाठवून दिले. संबंधित इसमाने त्याची डिलेव्हरी, अंत्रोळीकर नगरातील गुरुद्वारासमोरील रोडवर घेतली. 

त्यावेळी संबंधीत इसमाने त्या तेलाचे खरेदीपोटी ०१ चेक प्रकाश आरसीद यांना दिला. मात्र, त्या चेकवरील सहीमध्ये तफावत आढळल्याने, तो चेक वटला नाही. तसेच त्याचे खात्यावर चेकमध्ये नमूद केलेल्या रक्कमेइतकी रक्कम शिल्लक नसल्याचे दिसून आले. त्यानंतर आरसीद यांनी संबंधीत इसमास फोन केला असता, त्याचा फोन बंद असल्याचे आढळून आले.

या गुन्ह्याचा समांतर तपास, सोलापूर शहर गुन्हे शाखेकडील सपोनि निरगुडे व त्यांचे तपास पथकाने गुन्हा दाखल झाल्यानंतर लागलीच सुरु केला. त्यावेळी सपोनि निरगुडे व त्यांचे तपास पथकास, गुप्त बातमीदारामार्फत नमूद गुन्ह्यातील जेमिनी सनफ्लावर तेल व नेचर फ्रेश चक्की आटा त्याच्याकडे असणाऱ्या चार चाकी वाहनासह थांबला असून, तो रात्र होताच त्याच्याकडील जेमिनी सनफ्लावर तेल व नेचर फ्रेश चक्की आटा हा माल घेऊन जाणार आहे अशी माहिती मिळाली. त्यानुसार, सपोनि निरगुडे व त्यांचे तपास पथकाने सापळा लावून, त्यास ३० ऑक्टोबर रोजी ताब्यात घेतले.

त्याचं नांव सरबजितसिंग होरा असून त्याच्या ताब्यातून गुन्ह्यातील फसवणूक करुन अपहार केलेला, जेमिनी सनफ्लावर तेलाचे प्रत्येकी १५ लीटरचे २५ डब्बे व नेचर फ्रेश चक्की आट्याच्या प्रत्येकी ३० किलो वजनाच्या ४० बॅग, तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेले मोबाईल, बँक ऑफ बडौदाचे चेक, डेबीट कार्ड, रोख रक्कम चार चाकी वाहन असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आले. त्याच्याकडे कसून चौकशी करता, त्याने देहुरोड (पुणे), खार (मुंबई), बोरीवली (मुंबई) येथे अशाच प्रकारे गुन्हे केले असल्याची कबुली दिली. 
.........

To Top