प्रधानमंत्री पिक विमा योजना रब्बी हंगाम २०२३ पीक विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

shivrajya patra
सोलापूर : प्रधानमंत्री पिक विमा योजना रब्बी हंगाम २०२३ मध्ये राज्यात पिक विमा एक रुपयामध्ये भरून मिळणार आहे.  जिल्ह्यामध्ये रब्बी हंगाम साठी गहू (बागायत) पिकासाठी रक्कम ३३,००० रुपये, ज्वारी (बागायत) पिकासाठी रक्कम ३२,५०० रुपये व ज्वारी (जिरायत) पिकासाठी रक्कम २३,००० रुपये, हरभरा पिकासाठी रक्कम ३०,००० रुपये, उन्हाळी भूईमुग पिकासाठी रक्कम ४०,००० रुपये,रब्बी कांदा पिकासाठी रक्कम ६५,००० रुपये,एवढी विमा संरक्षित रक्कम आहे.  विमा भरण्यासाठी आधार कार्ड, बँक पासबुक, सातबारा व आठ अ उतारे स्वयंघोषणापत्र इ. कागदपत्रे आवश्यक आहेत. 

शेतकऱ्याने लागवड केलेल्या पिकाची नोंद ई पिक पहाणी मध्ये करावी.  विमा योजनेचा विमा भरलेल्या पिकात आणि ई पिक पहाणी मध्ये नोंदविलेल्या पिकात काही तफावत आढळल्यास ई पिक पहाणीमध्ये नोंदविलेले पीक अंतिम ग्राह्य धरण्यात येते.  योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होण्यासाठी रब्बी ज्वारी पिकासाठी ३० नोव्हेंबर, गहू, हरभरा, कांदा पिकासाठी १५ डिसेंबर तर उन्हाळी भुईमूग पिकासाठी  ३१ मार्च अंतिम मुदत असणार असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

विमा संरक्षणाच्या बाबींमध्ये पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकाच्या उत्पादनात येणारी घट ही विचारात घेतली जाते.  त्यामध्ये खालील जोखमींचा समावेश होतो.

पीक पेरणीपूर्व किंवा लागवण पुर्व नुकसानीमध्ये अपूरा पाऊस हवामानातील इतर प्रतिकुल घटकामुळे  अधिसुचित पिकाची त्या भागातील सर्वसाधारण क्षेत्राच्या ७५ टक्के  क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी लागवड होऊ शकली नाही तर विमा संरक्षण देय आहे.

हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत पूर पावसातील खंड दुष्काळ इत्यादी बाबीमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पादनात उंबरठा उत्पादनाच्या ५० टक्क्याहून अधिक गट अपेक्षित असेल तर विमा संरक्षण देय आहे.

काढणी पश्चात चक्रीवादळ अवेळी पाऊस यामुळे कापणी किंवा काढणी नंतर सुकविण्यासाठी शेतात पसरून ठेवलेल्या अधिसुचित पिकाचे नुकसान झाल्यास वैयक्तीक स्तरावर पंचनामे करून नुकसान भरपाई दिली जाते.

स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास भूस्खलन व गारपीट या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे  नुकसानग्रस्त झाल्यास अधिसुचित पिकाचे नुकसान हे वैयक्तिक पंचनामे करून निश्चित करण्यात येते.  काढणी पश्चात नुकसान स्थानिक नैसर्गिक आपत्ती या बाबी अंतर्गत नुकसान भरपाई मिळण्यासाठी पिकांचे आकस्मिक नुकसान झाल्यास ७५ तासाच्या आत  याबाबत केद्र शासनाच्या पिक विमा ॲपवर संबंधीत विमा कंपनी कृषी किंवा महसूल विभाग किंवा टोल फ्री क्रमांक याद्वारे कळवावे. यात नुकसानग्रस्त क्षेत्राचे सर्वेक्षण करुन नुकसान भरपाईची रक्कम निश्चित केली जाते.

संपर्ण हंगामातील विविध कारणामुळे अधिसुचित क्षेत्रातील  पिकाच्या सरासरी उत्पादनात उंबरठा उत्पादनापेक्षा घट आल्यास नुकसान भरपाईची रक्कम अंतिम केली जाते.

या  योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन दत्तात्रय गावसाने, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, सोलापूर  यांनी केले आहे.
To Top