अक्कलकोट/राम गायकवाड :
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर संघर्ष योध्दा मनोज जरांगे-पाटील यांनी पुनश्च आंदोलन सुरु केलं आहे. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी राज्याच्या अनेक जिल्हा अन् तालुक्याच्या ठिकाणी साखळी उपोषणं सुरू आहेत. या उपोषणांचं लोण आता ग्रामीण भागाबरोबरच राज्याच्या सीमावर्ती भागापर्यंत पोहोचलं आहे. सीमावर्ती भागातील उडगी इथं सर्व धर्मीय बांधवांनी एकत्र येऊन, गुरूवारी लाक्षणिक उपोषण करीत संघर्ष योध्दा जरांगे-पाटील यांच्या लढ्याला पाठिंबा दिला.
जालना जिल्ह्यातील अंतरावली सराठी येथे मनोज जरांगे-पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केलं. त्यावर राज्य शासनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांनी संघर्ष योध्दा जरांगे-पाटील यांच्याशी चर्चा करून मराठा समाजाला आरक्षण देण्याचं अभिवचन दिलं होतं.
त्यावेळी राज्य शासनाने एक महिण्याचा कालावधीत मराठा समाजाला आरक्षण हा प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिलं होतं. मनोज जरांगे-पाटील ४० दिवसांचा कालावधी लोटला, दरम्यान त्यांनी महाराष्ट्राचे अनेक विभाग पिंजून काढले. आता पुन्हश्च आंदोलन सुरू केलं आहे. त्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी अनेक भागात मराठा ओबीसी आरक्षणाचा लढा आता राज्याच्या सीमावर्ती भागात पोहोचला आहे.
अक्कलकोट तालुक्यातील उडगी येथे सर्वधर्मीयांनी
जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी गुरुवारी एक दिवस लाक्षणिक उपोषण केले. मौजे उडगी येथे मराठा समाज अल्पसंख्याक आहे. तरीही गावातील सर्व धर्मांनी या उपोषणाला बसून पाठिंबा दर्शविला, हेही विशेष !