... अन्यथा गुन्ह्यामध्ये वर्ग करून महाराष्ट्र दर्शन ! अत्याचार अन् व्यवस्थेच्या 'आंधळे' पणाविरुध्द उपोषण

shivrajya patra
सोलापूर : व्यवस्थेने जन्मतः ज्यांच्या माथी 'गुन्हेगारी' जमात अशा शिक्का मारलेल्या पारधी लोकांना पोलीस, अज्ञात आरोपीच्या गुन्ह्यामध्ये अटक दाखवून न्यायालयात हजर करतात. न्यायालयात हजर करतेवेळी पोलिसांविरुध्द काही तक्रार आहे का, असे विचारल्यास नाही म्हणून सांगायचे. अन्यथा वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये वर्ग करून महाराष्ट्र दर्शन घडवू अशी धमकी देतात, हे एखाद्या चित्रपटाचं कथानक नाही तर पदोपदी घडणारं वास्तव आहे. अशाच एका कुटुंबानं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर गुरुवारपासून आमरण उपोषण सुरू केलंय.

समाजात होणाऱ्या चोऱ्यांच्या घटनेबाबत पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हे नोंदविले जातात. अशावेळी संबंधित पोलीस हे घटना घडलेल्या परिसरात आसपासच्या गावात तालुक्यात राहणारे पारधी समाजातील व्यक्तींना त्यांचे वस्तीवर जाऊन उचलून पोलीस ठाण्यात आणतात. त्यांना लाथा-बुक्क्यांने, पट्ट्याने, चटणीचे पाणी टाकून, टायरमध्ये कोंबून, कधी लाकडी खूर्चीला बांधून तसेच गुप्तांगास विजेचा करंट देऊन, उपाशी ठेवून प्रसंगी उलटे टांगून अमानुष मारहाण करतात. त्यांना मारहाणीनंतर अनेक दिवस कोठडीत डांबून ठेवण्यात येते, त्याची कार्यालयीन दफ्तरी कोठेही नोंद नसते, असा आरोप उपोषणकर्त्या रविता प्रशांत भोसले हिनं केला आहे. 

बार्शी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरूध्द दाखल असलेल्या गुन्ह्यात पोलिसांनी मध्यरात्री रविताच्या घरात घुसून ताब्यात घेतले. गुन्हा ' कबूल ' हे वदवून घेण्यासाठी नाना प्रकारे मारहाण करून यातना दिल्या. तिला दिवस गेल्या चा तिचा आक्रोश पोलिसांच्या कानात घुसला नाही. तिनं हतबल होऊन सर्व सहन केलं. शेवटी आशेचा किरण असलेले सरकारी वकील ! त्यांनी ही तिच्या आक्रोशाला नाटक म्हणून पाहिलं. 

त्यांनाही आरोपींच्या मानवी हक्क आणि मानवतेचा विसर पडला. त्यांत सरकारी वकील भादुले यांनी मानवी न्यायापेक्षा त्यांच्या प्रक्टीस महत्वाचं मानलं, त्यांनी वस्तुस्थितीकडं कानाडोळा करीत तिची व्हिडीओ क्लिप काढून यू-ट्यूबवर टाकण्याची धमकी दिल्याचा रविता चा आरोप आहे. या पोलिसी अत्याचार आणि न्याय व्यवस्थेचा 'आंधळे' पणा समाजासमोर मांडण्यासाठी आमरण उपोषणास प्रारंभ केल्याचे उपोषणस्थळी सांगितले. तिच्या समवेत वशीकला कांतीलाल पवार, कोमल धीरज पवार, सविता अमोल शिंदे आणि शशिकांत रजनीकांत भोसले हे उपोषणास बसले आहेत. 

 
 
To Top