जमातच्या बैठकीत अर्ज आणि 'माल' वरुन वादावादी; दगड-फरशीच्या माऱ्यात तिघे जखमी

shivrajya patra

सोलापूर : जमातच्या बैठकीत प्रश्न सुटतात, असा सामान्यांचा समज असतो, मात्र अशाच एका बैठकीत झालेल्या वादावादीत दोन गटातील वाद पराकोटीला गेल्यानं त्यात दगड-फरशीच्या झालेल्या माऱ्यात दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी मध्यरात्री कुरेशी गल्लीत घडलीय. त्यात जाफर आझाद कुरेशी, फरदीन कुरेशी आणि वाजिद म. हनिफ कुरेशी असे तिघे जखमी झाले. या प्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात दोन्ही गटातील दहा जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस आयुक्तालयाच्या माहिती कक्षातून देण्यात आली. 

जमातच्यावतीने सोलापूर पोलीस आयुक्तालयात निवेदन देण्याच्या वेळी न आल्याचा रोष मनात धरून इब्राहिम महंमदसाब कुरेशी आणि त्यांच्या अन्य चार साथीदारांनी रऊफ म. हनिफ कुरेशी यांच्या घरासमोर येऊन दगडफेक करीत लोखंडी पाईपने रऊफ कुरेशी यांचा मुलगा फरदीन आणि भाऊ वाजीद यास दगड फरशीने मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार कुरेशी गल्लीत बुधवारी रात्री १०.३० वा. च्या सुमारास घडलीय.

याउलट, २५ ऑक्टोबर च्या रात्री जमात च्या बैठकीत वादावादी होऊन शिवीगाळी वाढत गेल्याने भांडण सोडविण्यासाठी आलेल्या इब्राहिम कुरेशी यांना फरदीन कुरेशी आणि त्याच्या चार साथीदारांनी दगडाने कपाळावर मारून कपाळ मोक्ष झाला. यावेळी त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. हा विवाद कोणता माल कापायचा या कारणावरून झाला असल्याची फिर्याद जाफर आजाद कुरेशी
( रा. १५६, दक्षिण सदर बाजार कुरेशी गल्ली सोलापूर ) यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात दिली.

या गुन्ह्यात दोन्ही गटातील इब्राहिम कुरेशी, अख्तर महमूद कुरेशी, गुलाम मोहम्मदबहादुर कुरेशी, जफर आझाद कुरेशी, कर्मा मोहम्मदबहादुर कुरेशी, फरदीन कुरेशी, रऊफ कुरेशी, बाबा कुरेशी, हजरत कुरेशी आणि वाजिद कुरेशी (सर्व रा. सोलापूर) अशी आरोपींची नावे आहेत. पोलीस हवालदार कंचे आणि पोलीस हवालदार इनामदार या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.
To Top