घरातून रोख ५ लाख ६० हजारांची चोरी अवघ्या चोवीस तासात चोरटा गजाआड

shivrajya patra
सोलापूर : एक संशयित चोरीची रक्कम घेऊन थांबला असल्याची गोपनिय खबर मिळाल्यावर गुन्हे प्रकटीकरण पथकाने त्या लॉजचे रजिस्टर तपासले असता, त्याबाबतची खात्री झाल्यावर संशयिताकडे मोर्चा वळवल्यावर तो पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पथकाने त्यास ताब्यात घेऊन झाडाझडती घेतली असता, त्याच्याजवळ ५ लाख ५६ हजारांहून अधिक रोकड मिळाली. त्याच्याकडे अधिक चौकशी करता, त्याने ती रक्कम एका घरातून चोरली असल्याचे सांगितले.

मुरारजी पेठ, अवंती नगरात पुजा गंजे यांच्या रो हाऊसमध्ये भाड्याने वास्तव्यास असलेल्या मोहसिन आयुब शेख (वय २५ वर्षे, व्यवसाय मोबाईल शॉपी, मूळ रा. मु.पो.लोहारा) याच्या घरातून, २५ सप्टेंबर रोजी सकाळी नऊ-साडे नऊ वा. च्या दरम्यान घराची साफ-सफाई करताना खुर्चीवर ठेवलेली कॅश बॉक्स अज्ञात चोरट्याने नजर चूकवून चोरून नेली, म्हणून अज्ञात चोरट्याविरुध्द २५ सप्टेंबर रोजी तक्रार आल्यावर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात कलम ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस स्टाफ व पंच असे समर्थ लॉज येथे गेले असता, तो संशयित व्यक्ती तेथून पाय काढण्याच्या बेतात असताना त्यास शिताफीने ताब्यात घेतले. त्यास त्याचे नाव व पत्ता विचारता त्याचे नाव अफताब सत्तार अत्तार (वय - २३ वर्षे, व्यवसाय नोकरी, रा. प्लॉट नंबर २६२, काळे प्लॉट, शिवाजी कॉलेजच्या मागे, उमरगा) असे असल्याचे पुढे आले. त्याचेकडे मुद्देमालाविषयी त्याने उडवा-उडवीचे उत्तरे दिली. 

त्यात पोलिसांचा विश्वास बळावल्याने दोन पंचासमक्ष त्यास विश्वासात घेवून चौकशी केली. त्याने लाकडी टेबलाखालून एक काळ्या रंगाची सॅक काढली. पंचासमक्ष सदर सॅकची पाहणी केली. त्यामध्ये ५ लाख ५६ हजारांहून अधिक रोख रक्कम मिळून आली. ती रक्कम अवंती नगरातील घरातून चोरली असल्याचे सांगितले. त्या गुन्ह्यात आरोपीस गजाआड करण्यात गुन्हे प्रकटीकरण शाखेला अवघ्या 24 तासात यश आले

ही कामगिरी पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने, पोलीस उप-आयुक्त विजय कबाडे, सहा. पोलीस आयुक्त (विभाग-१), संतोष गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वनाथ सिद, पोलीस निरीक्षक विकास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहा. पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे व पथक प्रविण चुंगे, अजय पाडवी, रविंद्र परबत, विनोद व्हटकर, कृष्णात बडुरे, सचिनकुमार लवटे, अजय चव्हाण, विनोद पुजारी, पंकज घाडगे, सुधाकर माने, तौसिफ शेख, अमोल खरटमल, शशिकांत दराडे, नागनाथ गुळवे यांनी पार पाडली.
To Top