सोलापूर : चालकाच्या निष्काळजीपणामुळे भरधाव सिमेंट मिक्सर हायवाची धडक लागून झालेल्या अपघातात तरुण जागीच ठार झाला तर अन्य एक जण जखमी झाला. ही दुर्घटना सोलापुरातील नई जिंदगी परिसरात शनिवारी सकाळी ११ वा.पूर्वी घडली. म. गौस रफिक नदाफ (वय-२२ वर्ष) असे मृताचे नाव असून त्याच्या अपघाती मृत्यूमुळे नदाफ कुटुंबीयांचा आधारवड कोसळला. चालकाच्या हयगयीमुळे नई जिंदगीत तरूणाच्या 'जिंदगी' ला ब्रेक लागल्याची भावना प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केली.
याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, गुरुनानक चौक हुतात्मा कुर्बान हुसेन नगरातील रहिवासी म. गौस नदाफ पेंटर्स काम करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ भागवत होता. तो नई जिंदगी परिसरातील अमन चौक- मजरेवाडी रस्त्याने दुचाकीवर कामाच्या निमित्ताने त्याच्या सहकाऱ्यासह मजरेवाडी रस्त्याने जात होता. त्यांच्या पाठीमागून येत असलेल्या सिमेंट मिक्सर हायवाची त्याच्या दुचाकीस धडक लागून हा अपघात घडला.
या अपघातात त्याच्या पोटावरून चाक गेल्याने तो गंभीररित्या जखमी झाला. त्याचा सहकारी जखमी झाला असल्याचे सांगण्यात आले. त्यांना माजी नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी सर्वोच्च रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी म. गौस नदाफ याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले.
सिव्हिल पोलीस चौकीत या अपघाताची नोंद झाली असून अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले. गौस नदाफ याच्या मजुरी व उत्पन्नावर त्याच्या घराचा गाडा चालत होता. त्याच्या मृत्यूमुळे नदाफ कुटुंबियांचा आधारवड मुळासकट उन्मळून पडला असल्याची भावना समाजसेवक बाबा मिस्त्री यांनी व्यक्त केलीय.