सोलापूर : खुल्या जगात स्वच्छंद आयुष्य जगणाऱ्या माणसाला 'चार भिंती' आडचं जगणं अपरिचीत असते. अशाच चार भिंती आयुष्य कंठत असलेल्या माथ्यावर अपराधी (?) असा शिक्का उमठलेल्या अपराधित माणसांसाठी मराठा सेवा संघ संचलित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने 'रक्षा बंधन' कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
स्थळ : जिल्हा कारागृह, सोलापूर.
आज रक्षाबंधन या बंधुत्वाच्या नात्यांची विण घट्ट ठेवणाऱ्या आनंदमय क्षणी कारागृहाच्या चार भिंती आड असलेल्या कच्च्या-पक्क्या अपराधित (?) माणसांशी आपलं रक्ताचे नसेल पण माणुसकीचे आणि मानवतेचे नाते आहे, या भावनेतून मराठा सेवा संघ संचलित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने 'रक्षा बंधन' सणाचा आनंद चार भिंतीच्या आत पाऊल ठेवत द्विगुणित करण्यात आला.
या प्रसंगी कारागृह अधीक्षक मिंड, आगवणे, उप अधीक्षक प्रदीप बाबर, छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे शहराध्यक्ष हाजी मतीन बागवान, जिल्हाध्यक्ष शफीक रचभरे, मराठा सेवा संघाचे राम गायकवाड, जावेद बद्दी, राजू हुंडेकरी, आशा मराठी विद्यालयाच्या विद्यार्थीनींच्या हस्ते कैदी बंदिवानांना राखी बांधून बंधुत्वाच्या नात्याला खत-पाणी दिले.
याप्रसंगी आशा मराठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका तस्लिम पठाण, तहसिन सय्यद, असिफ बडेघर, सिध्दू निंबाळ यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
................ चौकट ...........
माणूस जन्मतः गुन्हेगार नसतो : मतीन बागवान
चार भिंतीच्या आत जाऊन रक्षाबंधन सणाचा आनंद सर्वांशी वाटण्याची संधी दिल्याबद्दल कारागृह प्रशासनाचे अधिकारी-कर्मचाऱ्यांचे शहराध्यक्ष मतीन बागवान यांनी
मनापासून आभार मानले. माणूस जन्मतः गुन्हेगार नसतो, आपल्या हातून नकळत झालेल्या अपराधाची शिक्षा आपण भोगत आहात, यापुढे आपण एक चांगला माणूस म्हणून जगण्याचा संकल्प करा, समाजातील वाईटपणा संपवा, अशा हृदयस्पर्शी शब्दात हाजी मतीन बागवान यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.