दे. ऋ. ब्रा. तर्फे 110 विद्यार्थ्यांना सव्वा लाख रूपयांच्या अर्थसहाय्यासह शैक्षणिक साहित्याचे वाटप
एल. जी. काकडे एज्युकेशनल फाऊंडेशनचे सहकार्य
सोलापूर : विद्यार्थ्यांनी उत्तम करिअर साठी ज्ञान, कौशल्य, चांगली वृत्ती, कठोर परिश्रम व निर्णय क्षमता या पंचसूत्रीचा अवलंब करावा, असं आवाहन सोलापूर जनता सहकारी बँकेचे संचालक महादेव न्हावकर यांनी येथील देऋब्रा संस्थेच्या कार्यक्रमात केले. 
सोलापूर देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्था व कै. एल.जी. काकडे एज्युकेशनल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता पहिली ते उच्च पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या गरीब व होतकरू अशा 110 विद्यार्थ्यांना सुमारे 1 लाख 25 हजार रूपयांच्या अर्थसहाय्याचे तसेच शैक्षणिक साहित्याचे वितरण प्रमुख पाहुणे न्हावकर यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत येळेगांवकर होते.
येथील दत्त चौकातील संस्थेच्या समर्थ सभागृहात रविवारी, 14 जून रोजी हा कार्यक्रम झाला. प्रमुख अतिथी न्हावकर यांच्या हस्ते श्रीसंत समर्थ रामदास स्वामींच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी दहावी व बारावीतील गुणवंतांचा विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी अध्यक्ष डॉ. येळेगावकर, उपाध्यक्ष विजय कुलकर्णी, दत्तात्रय आराध्ये, कार्यवाह श्याम जोशी, खजिनदार सतीश पाटील, महिलाध्यक्षा हेमा चिंचोळकर, युवक अध्यक्ष सुशांत कुलकर्णी, क्षितीजा गाताडे, प्रा. शुभदा देशपांडे, स्मिता देशपांडे, मंगेश महाजन यांच्यासह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी न्हावकर यांनी विद्यार्थ्यांना करिअरबाबत जागृत राहून योग्य त्या शिक्षणप्रवाहाचा अवलंब करण्याचे तसेच शिक्षणाद्वारे स्वतःसह कुटूंब व समाजाला भूषणावह काम करण्याचे आवाहन केले. उपाध्यक्ष दत्तात्रय आराध्ये यांनी प्रास्ताविक केले. युवक अध्यक्ष सुशांत कुलकर्णी यांनी यादीवाचन केले. कार्यवाह श्याम जोशी यांनी सूत्रसंचालन करुन आभार मानले.
....चौकट
यावेळी अभियांत्रिकी व वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या 06 गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रत्येकी अडीच हजार रूपयांची काकडे व ठोंबरे शिष्यवृत्ती देऊन विशेष सन्मान करण्यात आला. तसेच दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना फोल्डर फाईल्ससह रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
