यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येकानं अखंडपणे प्रयत्न करीत राहिलं पाहिजे : शिक्षणाधिकारी सचिन जगताप

shivrajya patra

"प्रवेशोत्सवाच्या जल्लोषात नवागतांचे शिक्षणाधिकाऱ्यांच्या हस्ते स्वागत; विद्यार्थ्यांना प्रेरणेचा नवा संदेश"

सोलापूर : विद्यार्थ्यांची मोठी स्वप्ने असावीत. ती साकारण्यासाठी अपयशाला न घाबरता  कठोर परिश्रम केलं पाहिजे, प्रयत्नाचं सातत्य यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवितं. त्यासाठी प्रत्येकानं अखंडपणे प्रयत्न करीत राहिलं पाहिजे, असा महत्वपूर्ण संदेश शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी नवप्रवेशित विद्यार्थ्यांना दिला.

येथील अक्कलकोट रोडवरील, सद्संकल्प शिक्षण समूहाच्या राष्ट्रसंत प्राथमिक शाळा व विश्वभूषण विद्यालयामध्ये नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी प्रवेशोत्सव व नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात करण्यात आले.

या कार्यक्रमास शिक्षणाधिकारी (माध्यमिक, जिल्हा परिषद सोलापूर) सचिन जगताप यांची प्रमुख अतिथी उपस्थिती होती. सद्संकल्प शिक्षण समूहाचे संस्थापक सचिव समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानज्योती माता सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर नवागत विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन व टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. याप्रसंगी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सचिन जगताप बोलत होते.

यावेळी सूरज अंबुरे , गुरु रेवे, अरविंद ताटे (माध्यमिक शिक्षण विभाग, सोलापूर), संस्थेचे कोषाध्यक्ष बोधिप्रकाश गायकवाड, मुख्याध्यापक सत्यवान पाचकुडवे आणि मुख्याध्यापिका मंजुश्री भालशंकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

नवीन विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह ओसंडून वाहत होता. यावेळी विद्यार्थ्यांना शासनाकडून प्राप्त झालेल्या मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी नवीन पुस्तकांचे आनंदाने स्वागत केले. सोमवारी नो व्हेईकल डे असल्यामुळे शिक्षण अधिकारी सचिन जगताप कार्यक्रमास सायकलवर आले होते.

भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी अत्यंत साधारण परिस्थितीतून शिक्षणाच्या बळावर देशाच्या राष्ट्रपतीपदापर्यंत मजल मारली. त्यांचं शिस्तबद्ध जीवन, विज्ञानावरील प्रेम, देशभक्ती आणि विद्यार्थ्यांबद्दलची आत्मीयता अशा विविध पैलूवर बोलताना, शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा आदर्श प्रत्येक विद्यार्थ्यानं घ्यावा, असं आवाहन केलं.

"स्वप्ने ती नसतात जी झोपेत पडतात, तर स्वप्ने ती असतात, जी स्वप्न तुम्हाला झोपू देत नाहीत," ती साकारण्यासाठी डॉ. कलाम यांचा संदेश विद्यार्थ्यांनी आत्मसात केला पाहिजे, असं उर्जादायी मार्गदर्शन शिक्षणाधिकारी जगताप यांनी करून, शिक्षणाचे महत्त्व विशद केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, शिक्षणासोबत संस्कार, शिस्त आणि सामाजिक जबाबदारी यांचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी मोबाईल व इतर आकर्षणांपासून दूर राहून अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं, वाचनाची सवय लावावी आणि शिक्षक व पालकांचा आदर करावा, असे आवाहन त्यांनी केले. 
गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील असल्याचे सांगून, विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणा, कष्ट आणि चिकाटी यांच्या बळावर जीवनात यश संपादन करावे, असा प्रेरणादायी संदेशही भालशंकर यांनी दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सत्यवान पाचकूडवे यांनी केले. सूत्रसंचालन प्रवीण पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी दिनेश भालशंकर यांनी उपस्थित मान्यवर, शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांचे आभार मानले.  हा प्रवेशोत्सव विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साहपूर्ण वातावरणात झाली.

To Top