सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगांव येथील कृषि सहाय्यकानं, शेतकऱ्यास शिवीगाळी करून त्यास जीवे मारण्याची धमकी दिल्यानं विभागीय कृषि सहसंचालक (पुणे) दत्तात्रय गावसाने यांनी कृषि सहाय्यकावर शिस्तभंगप्रकरणी निलंबनाची कारवाई केलीय. अमोल नामदेव देवकर असं निलंबीत कृषि सहाय्यकाचं नाव आहे. त्याच्यावर झालेली निलंबनाची कारवाई जणू मस्तवाल कर्मचाऱ्यांच्या मनमानीवर प्रहार मानला जातोय.
या घटनेची पार्श्वभूमी अशी की, कासेगांव येथील शेतकरी अजित जाधव यांनी, 'साहेब 4 दिवसांपासून फोन करतोय, किमान फोन तरी उचला' असा संदेश कृषि सहाय्यक वॉटस् अॅप ग्रुप वर लिहिल्यावर कृषि सहाय्यक अमोल देवकर यांनी अॅडमीन या नात्यानं ग्रुपमधून रिमुव्ह केलं. 
त्यानंतर त्या शेतकऱ्याच्या मोबाईलवर कॉल करून कोणाच्याही कर्ण पटलावर आल्या तर सहन होणार नाही, अशा शब्दात त्या शेतकऱ्यास शिवीगाळी सुरु केली. त्यावेळी त्या शेतकऱ्यांनं या मस्तवाल कृषि सहाय्यक देवकर याला त्याच शब्दात उत्तरपूजा केलीय. या वाक्:युध्दात देवकर यांन गावाचे सरपंच आणि गावाला शिवीगाळी करीत स्वतःची 'पात्रता' दाखवून दिलीय.
शुक्रवारी सकाळी कासेगांव इथं लोकमंगल आणि तालुका कृषि कार्यालय च्या वतीनं एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, तिथंही या शिवीगाळीवर गुऱ्हाळ चालले, शेवटी त्या शेतकऱ्यानं, सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात कृषि सहाय्यक देवकर याच्याविरुध्द शिवीगाळी करून जीवे मारण्याची धमकी दिल्यासंदर्भात तक्रार दाखल केली.
या संतापजनक घटनेची सोशल मिडीयावर सामाईक झालेली ऑडिओ क्लिप हाती लागल्यावर प्रहार शेतकरी संघटनेचे जमीर शेख यांनीही या विषयाला उचलून धरलं होतं. त्यातच विभागीय कृषि सहसंचालक दत्तात्रय गावसाने यांनी कृषि सहाय्यक देवकर याच्या तडकाफडकी निलंबनाचे आदेश पारित केले. पुढील आदेशापर्यंत देवकर हे मुख्यालयात राहतील, असाही उल्लेख त्या आदेशात असल्याचं दिसतंय.
