सोलापूर : जयंती उत्सव कालावधीत मिरवणुकीमध्ये डॉल्बी सिस्टीमचा मोठ्या प्रमाणात वापर होण्याची शक्यता असल्यामुळे भारतीय नागरी सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163(1) अन्वये डॉल्बी वापरास आणि कलम 163 अन्वये प्रखर बीम लाईट, प्लाझमा व लेझर बीम लाईट वापरास प्रतिबंध करण्यात आला असल्याचं पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
सोलापूर शहर हद्दीत 14 ते 21 एप्रिल या कालावधीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करण्यात येणार आहे. जयंती उत्सव काळातील मिरवणुकी पाहण्याकरीता आलेल्या नागरिकांपैकी काही नागरिकांनी डॉल्बी सिस्टीममुळे कानाचा, छातीचा त्रास होऊन कायमचे अपंगत्व अथवा जिवितास धोका निर्माण झाल्याची प्रकरणे निदर्शनास आली आहेत.
या संबंधी सोलापूर शहरातील जेष्ठ नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांनी त्यांना व इतर नागरिकांना डॉल्बी सिस्टीममुळे जिवितास धोका तसेच इतर शारीरिक दुष्परिणाम होत असल्याचे निवेदने या कार्यालयास सादर केले आहेत.
तसेच उपरोक्त कालावधीत भारतीय नागरी सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 अन्वये प्रखर बीम लाईट, प्लाझमा व लेझर बीम लाईट वापरास कलम 163 अन्वये बंदी आदेश जारी करण्यात आलाय.
सोलापूर शहरामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवानिमित्त सुमारे 262 सार्वजनिक मंडळे स्थापन होत आहेत. श्री. महात्मा बसवेश्वर जयंती उत्सवानिमित्त सुमारे 38 सार्वजनिक मंडळे स्थापन होत आहेत. त्यापैकी 19 एप्रिल रोजी 102 सार्वजनिक मंडळांकडून मिरवणुका काढण्यात येणार आहेत.
मिरवणुकीमध्ये साऊंड सिस्टीमसोबत लावण्यात येणारे प्रखर बीम लाईट, प्लाझमा व लेझर बीम लाईट यांच्या प्रखर प्रकाशामुळे रस्त्यावरुन जाणारे वाहन चालकांचे डोळे दिपून चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटून ते वाहन मिरवणुकीमध्ये अगर इतरत्र जाऊन दुर्घटना घडू शकते.
तसेच मिरवणूक पाहण्यासाठी आलेले लहान मुले, वयोवृध्द नागरिक, सामान्य नागरिक यांचे डोळ्यास इजा होऊन डोळा कायमचा निकामी होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे मिरवणूकीमध्ये डॉल्बी आणि प्रखर बीम लाईट, प्लाझमा व लेझर बीम लाईट प्रतिबंध घालणे आवश्यक आहे, असं पोलिस आयुक्तांनी त्या प्रसिध्दी पत्रकात म्हटलं आहे.
