सोलापूर : बाल विवाह रोखण्यात सतर्कतेमुळं पोलिसांना यश आलंय. बाळे येथील खंडोबा मंदिराजवळील अंबिका नगरात शनिवारी होऊ घातलेल्या बाल विवाहासंबंधी माहिती मिळाल्यावर वधुबाबत त्यांच्या पालकाकडे चौकशी केली असता वधूचे वय 13 वर्षे, 06 महिने 12 दिवस असल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर अल्पवयीन मुलीला बालकल्याण समितीसमोर हजर करुन बाल विवाह रोखण्यात आला.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, बाळे येथील खंडोबा मंदिराजवळील अंबिका नगरातील गुरुकमल मंगल कार्यालयात साखर पुड्यानंतर विवाहाची तयारी सुरु असून वधू अल्पवयीन असल्याची माहिती मिळाल्याने पोलीसांनी त्या ठिकाणी जावून पाहिले असता, तेथे वधु-वर पक्षाकडील नातेवाईक जमलेले होते. 
पोलिसांनी वधुबाबत त्यांच्या पालकाकडे चौकशी केली असता, वधु अल्पवयीन असून तिचं वय अवघे 13 वर्षे, 06 महिने आणि 12 दिवस असल्याचे स्पष्ट झाले. 
पोलीसांनी वधु आणि वर पक्षाकडील संबधितांना बाल विवाह कायद्याबाबत समजून सांगितले. तसेच दोन्ही परीवारांचे समुपदेशन केले. त्यानंतर अल्पवयीन मुलीला बालकल्याण समिती समोर हजर करुन बाल विवाह रोखण्यात आलेला आहे.
ही उलेखनिय कामगिरी पोलीस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस उप-आयुक्त (एच.क्यु) गौहर हसन, सहा. पोलीस आयुक्त पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष पोलीस निरीक्षक स्नेहा म्हेतर, या कक्षाकडील पोलीस उप निरीक्षक अश्विनी काळे, फौजदार चावडी पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक सुतार, तसेच महिला सुरक्षा कक्ष व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष असे संयुक्तपणे यशस्वीरित्या कारवाई केली.
