सोलापूर/10 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय सोलापूर, संगमेश्वर महाविद्यालय सोलापूर व जिल्हा उद्योग केंद्र सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहानिमित्त संगमेश्वर महाविद्यालयात युवकांसाठी मार्जिन मनी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
कार्यशाळेत जिल्हा उद्योग केंद्राचे प्रकल्प अधिकारी श्री. राजेश शेखर शिंदे यांनी युवकांना उद्योजकतेबाबत मार्गदर्शन करताना, "आजच्या युगात स्वावलंबी जीवनासाठी उद्योजकता हा सर्वोत्तम पर्याय असून युवकांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन उद्योग क्षेत्रात पुढे यावे असे आवाहन केले.
कार्यक्रमाची सुरुवात थोर समाजसुधारकांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आली. कार्यक्रमाची प्रस्तावना सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग सोलापूर यांच्या वतीने सौ. सुलोचना सोनवणे यांनी मांडली.
त्यांनी विद्यार्थ्यांना समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. तसेच समाज कल्याण विभागाचे श्री. राहुल तारलकर यांनी मार्जिन मनी योजनेविषयी सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संगमेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा हे होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी उदाहरणांच्या माध्यमातून उद्योजकतेचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.
या कार्यशाळेस राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे समन्वयक प्रा. डॉ. आण्णासाहेब साखरे यांचे सहकार्य लाभले. तसेच डॉ. संघप्रकाश दुढे, पी. टी. गायकवाड, जिल्हा प्रकल्प अधिकारी श्रीमती प्रणिता कांबळे, श्रीमती अश्विनी सुपाते, श्रीमती नालंदा शिंदे, श्रीमती ज्योती ओवाळ हे समतादूत व इतर सहकारी यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवक गायकवाड यांनी केले, तर प्रा. माने मॅडम यांनी आभार प्रदर्शन केले.