डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधन समितीच्या प्रबोधन व्याख्यानमालेस अभ्यासक शंकर पाटील, प्रा. डॉ. विजय माकणीकर आणि डॉ. हर्षवर्धन कोल्हापुरे यांची हजेरी

shivrajya patra

सोलापूर  : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधन समिती, सोलापूर च्या वतीने प्रबोधन व्याख्यानमाला-2026 चं आयोजन करण्यात आलंय. व्याख्यानमालेचं यंदाचं पहिलं वर्ष आहे. 

ही व्याख्यानमाला जुळे सोलापुरातील वसुंधरा कला महाविद्यालयात आयोजित करण्यात आली असून तीन दिवस चालणाऱ्या व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प शनिवारी, 11 एप्रिल रोजी सायंकाळी समाजवाद व लोकशाही विचारांचे अभ्यासक शंकर पाटील गुंफणार असल्याचं डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधन समितीच्या वतीनं सांगण्यात आलंय.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडं शोषित, वंचित, दुर्लक्षित समाज समुहाच्या उद्धाराचे, त्यांच्या मानवीकरणाचे उद्गाते म्हणून संपूर्ण जगभरातून पाहिलं जातं. समता स्वातंत्र्य व न्याय या त्रि:सूत्रीच्या पायावर समाज व शासन व्यवस्था उभारण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. जाती, धर्म, पंथ, प्रदेश, भाषा, सांस्कृतिकता यांची विविधता असणारा हा देश सुंदर अशा एकतेने बांधलेला आहे. 

ही विविधतेने अलंकृत एकता सुंदर, सुदृढ आणि सक्षम बनविणारी संविधानिक शक्ती निर्माण करून या उत्तम राष्ट्रामागे उभी करण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सिंहाचा वाटा आहे. जगभरात मानवी उद्धाराचा विचारमार्ग म्हणून त्यांचे विचार अंगिकारले जात आहेत. त्यांचा जन्मदिवस जागतिक ज्ञान वारसा दिन म्हणून साजरा होत आहे. मात्र त्यांच्या जन्म राज्यात, त्यांच्या ज्ञान वारश्याला डावलून अंधभक्तीनं ग्रासल्याचं विदारक चित्र आहे. 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्र हितकारी, विकासात्मक विचारधन लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, या हेतूनं बहुजन सहभागातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विचार प्रबोधन उपक्रमाने साजरी करण्याचा संकल्प करून  डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधन समितीनं पहिल्यांदा तीन दिवसीय व्याख्यानंमालेचं आयोजन केलं आहे.

महात्मा ज्योतिबा फुले जयंती ते 14 एप्रिल  डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती या तीन दिवशी तीन वैचारिक व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. या व्याख्यानमालेचे उद्घाटक म्हणून ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत प्रा. डॉ. लक्ष्मणराव ढोबळे उपस्थित राहतील. 

यावेळी समाजवाद आणि लोकशाही विचाराचे अभ्यासक शंकर पाटील, जातीविरहित समाज व्यवस्थेची संकल्पना : संत बसवण्णा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान या विषयाला घेऊन व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफतील. यावेळी जुळे सोलापुरातील स्वामी विवेकानंद प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य अंबादास पांढरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.

रविवारी, 12 एप्रिल रोजी सायंकाळी डॉ. आंबेडकरांच्या दृष्टिकोनातून संविधानिक आरक्षण आणि न्यायालयांची भूमिका या विषयावर दुसरे पुष्प प्रा. डॉ. विजय माकणीकर ( शिवाजी विधी महाविद्यालय, परभणी.) गुंफतील. याप्रसंगी भारतीय संविधानाचे अभ्यासक निजामुद्दीन शेख ( सोलापूर) कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.

सोमवारी, 13 एप्रिल रोजी सायंकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर लातूर, राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. हर्षवर्धन कोल्हापुरे या व्याख्यानमालेचे तिसरे आणि अंतिम पुष्प गुंफतील. आंबेडकरी चळवळ : ऐतिहासिक वाटचाल, सद्यस्थिती, आव्हाने व पर्याय हा त्यांचा विषय असणार आहे. यावेळी जुळे सोलापुरातील वसुंधरा कला महाविद्यालयाचे प्राचार्य तानाजी देशमुख कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील, असंही सांगण्यात आलंय.

●●●●●
... ही आहे संयोजन समिती :
अध्यक्ष- प्रशांत गायकवाड, प्रा. एम. आर. कांबळे, प्रा. डॉ. सुहास उघडे, मनीष सुरवसे, प्रशांत बाबर, डॉ. जयकुमार कस्तुरे, अरुण क्षिरसागर, राजेश जगताप, अरविंद जेटिथोर, सचिन साबळे, मुसा अत्तार, रतिकांत कांबळे, युवराज माने, अंबादास आळगीकर, प्रवीण सुकाळे आणि सचिन गोडसे.
●●●●●

To Top