नोकरशाहीचे लोकशाहीकरण झाले पाहिजे : प्रा. डॉ. विजय माकणीकर

shivrajya patra


सोलापूर : लोकशाहीमध्ये प्रत्येक व्यक्ती भिन्न आहे, त्यांचे स्वातंत्र्य ही भिन्न आहे. प्रत्येकाचे प्रतिनिधित्व प्रशासनामध्ये दिसले पाहिजे, असे मत प्रा. डॉ. विजय माकणीकर यांनी व्यक्त केले. 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधन समितीने जुळे सोलापुरातील वसुंधरा कला महाविद्यालयात आयोजित केलेल्या बौद्धिक व्याख्यानमालेत ते बोलत होते. यावेळी प्रा. एम. आर. कांबळे, प्रशांत गायकवाड, दत्ता थोरे, प्रा. डॉ. सुहास उघडे आणि यशोदीप आठवले यांची प्रमुख उपस्थिती होती.
व्याख्यानमालेच्या खुल्या विचारपीठावर प्रारंभी महात्मा फुले, राजर्षी शाहू आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून रविवारी,12 एप्रिल रोजी सायंकाळी 'डॉ. आंबेडकरांच्या दृष्टिकोनातून संविधानिक आरक्षण आणि न्यायालयांची भूमिका' या विषयावर दुसरे पुष्प प्रा. डॉ. विजय माकणीकर ( शिवाजी विधी महाविद्यालय, परभणी) यांच्या दुसऱ्या विचार पुष्पाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान निजामुद्दीन शेख यांनी भूषविले.
यावेळी प्रा. डॉ. विजय माकणीकर पुढे म्हणाले की, नोकरशाहीचे लोकशाहीकरण होणे अतिशय महत्त्वाचे आहे. सामाजिक व आर्थिक समता प्रस्थापित होणे गरजेचे आहे. यासाठी संविधानिक नैतिकता पाळली पाहिजे. लोकसंख्येनुसार प्रत्येकाला प्रतिनिधित्व द्यावे लागेल, तरच वंचित समूहामध्ये बंधुभाव निर्माण होईल.
अध्यक्षीय आढाव्यात निजामुद्दीन शेख यांनी संविधानाची आवश्यकता आणि संविधानाचे काटेकोर पालन करणे किती महत्त्वाचे आहे, याबद्दल आपलं मत मांडले. यावेळी इम्तियाज शेख, प्रशांत बाबर, मनीष गडदे, युवराज माने आणि संजय रणदिवे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनीष सुरवसे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. किशोर जोगदंड यांनी केले. पाहुण्यांची ओळख प्रा. डॉ. भागवत गजधने यांनी करून दिली. सरतेशेवटी प्रवीण सुकाळे यांनी सर्व उपस्थितांचं आभार मानले. 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तनिष्क वाघमारे, आर्यन कापुरे आणि मधुर गायकवाड यांनी परिश्रम घेतले.
*****
To Top