वालचंदमध्ये ‘युथ वेलनेस रिट्रीट २०२६’ : अध्यात्म, विज्ञान आणि आत्मजागरूकतेचा प्रेरणादायी संगम

shivrajya patra

सोलापूर : शहरातील वालचंद शिक्षण समूहांतर्गत वालचंद महाविद्यालयाच्या प्रांगणात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित करण्यात आलेला ‘युथ वेलनेस रिट्रीट २०२६’ हा अनोखा आणि प्रेरणादायी उपक्रम उत्साहात संपन्न झाला. परमपूज्य मुनिश्री १०८ वीरसागरजी महाराज यांच्या मंगल मार्गदर्शनाखाली सुमारे २५०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांच्या मानसिक, शारीरिक आणि आध्यात्मिक आरोग्याचा समतोल साधणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू होता.

कार्यक्रमाच्या प्रारंभी परमपूज्य आचार्य श्री विद्यासागर महाराज यांच्या प्रेरणादायी विचारांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले. वालचंद शिक्षण समूहाचे मानद सचिव डॉ. रणजित गांधी, भूषण शहा, पराग शहा तसेच सर्व प्राचार्यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला.

डब्ल्यू.आय.टी.चे माजी विद्यार्थी वैभव परतवार, सौ. पूजा परतवार आणि अंकित जैन यांच्या सहकार्याने कार्यक्रमाची सुरुवात ऊर्जावान झुंबा नृत्याने झाली. त्यानंतर योग व ध्यान सत्रांद्वारे विद्यार्थ्यांना मानसिक स्थैर्य, एकाग्रता आणि अंतर्मनाशी संवाद साधण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले.

मुनिश्री वीरसागरजी महाराज यांनी ‘ॐकार’ ध्वनीचे महत्त्व विशद करताना श्वासावर नियंत्रण ठेवण्याची गरज अधोरेखित केली. “श्वास ही मेंदूची गुरुकिल्ली आहे. ‘ॐकार’ जपामुळे मनःशांती प्राप्त होते, ताणतणाव कमी होतो आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते,” असे त्यांनी सांगितले. नियमित ध्यान व प्राणायामामुळे शरीरातील चेतासंस्था, पचनसंस्था व श्वसनसंस्था संतुलित राहतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

विद्यार्थ्यांच्या ‘अंतर्गत सॉफ्टवेअर अपडेट’साठी हा उपक्रम राबविण्यात आल्याचे आयोजकांनी नमूद केले. स्वतःला ओळखणे, भावनांवर नियंत्रण ठेवणे आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित करणे या जीवनमूल्यांवर विशेष भर देण्यात आला. ‘सोहम’ आणि ‘ॐ’ मंत्रांच्या एकसुरात झालेल्या जपामुळे संपूर्ण परिसर अध्यात्मिक स्पंदनांनी भारावून गेला.

आपल्या उद्बोधनात मुनिश्रींनी जैन धर्मातील अहिंसा, क्षमा आणि द्वेषरहित जीवनाचे महत्त्व अधोरेखित केले. “मनात क्रोध, द्वेष वा कपट न ठेवता निर्मळ भावनेने जीवन जगणे, हीच खरी साधना आहे,” असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. त्यांच्या प्रेरणादायी कवितेने विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मकतेची नवी ऊर्जा निर्माण केली.

वैज्ञानिक दृष्टिकोनातून मार्गदर्शन करताना त्यांनी मेंदूतील ‘अमिग्डाला’ हा भाग भीती व रागाशी संबंधित असून ‘प्रि-फ्रंटल कॉर्टेक्स’ निर्णयक्षमतेसाठी महत्त्वाचा असल्याचे स्पष्ट केले. ध्यान, प्राणायाम आणि सकारात्मक विचारसरणीमुळे मानसिक संतुलन राखता येते, असे त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्न उपस्थित करून आत्मपरीक्षणाची दिशा दाखवली. ‘सेल्फ रिफ्लेक्शन’ आणि ‘SWOT विश्लेषण’ (स्वतःच्या ताकदी, मर्यादा, संधी आणि धोके) यांचे महत्त्व पटवून देत, “स्वतःकडे प्रामाणिकपणे पाहिल्यासच खरी प्रगती साधता येते,” असे त्यांनी नमूद केले.

या रिट्रीटमुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य जागृत झाले असून शैक्षणिक प्रगतीसोबतच जीवनमूल्यांची जाणीव अधिक दृढ झाल्याचे चित्र दिसून आले. अध्यात्म, विज्ञान आणि आधुनिक जीवनशैली यांचा समतोल साधणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरत आहे. मानसिक सशक्तता, आत्मजागरूकता आणि अंतर्मुख साधनेचा संदेश देणारा हा उपक्रम जैन धर्माच्या तत्त्वज्ञानाशी सुसंगत असा जीवनदृष्टिकोन रुजविणारा ठरला.
To Top