एकनाथ शिंदे यांचं छत्रपती संभाजीनगरात पिवळे रेशन कार्ड तर देवेंद्र फडणवीस यांचं आधार आणि उत्पन्नाचा दाखला

shivrajya patra
एकनाथ शिंदे यांचं छत्रपती संभाजीनगरात पिवळे रेशन कार्ड तर देवेंद्र फडणवीस यांचं आधार आणि उत्पन्नाचा दाखला

छत्रपती संभाजीनगरमधून धक्कादायक अन्  प्रकार समोर आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावाशी साधर्म्य नावाचे पिवळे रेशन कार्ड बनवण्यात आलं आहे. याप्रकरणी जिल्हा पुरवठा विभागाच्या अन्नधान्य वितरण अधिकारी भारती वाकोडे यांनी तक्रार दिली असून पोलिसांनी संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या धक्कादायक प्रकारानंतर खळबळ उडाली आहे.

काही दिवसांपूर्वी एआयएमआयएम पक्षाचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत एकनाथ संभाजी शिंदे आणि 
देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांचे आधार कार्डसह इतर कागदपत्रे सादर करून, शासकीय योजना लाटण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे आरोप केले होते. हे आरोप करताना त्यांनी उभयतांची ती कागदपत्रं माध्यमांसमोर ठेवली होती.

या बनावट रेशन कार्डमधील तपशील,
 त्यामधील माहिती पाहिली असता मूळ रेशनकार्डाप्रमाणेच ते तयार करण्यात आल्याचे समोर आले. दोन्ही रेशनकार्ड धारकांचं वार्षिक उत्पन्नाच्या दाखल्यावर 90 हजार रुपयांचं उत्पन्न असल्याचं दाखल्यांवरून स्पष्ट होतंय.

शिधापत्रिका धारक एकनाथ शिंदे या नावाने तयार झालेल्या पिवळ्या रेशनकार्डमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे, मुलगा 
श्रीकांत शिंदे, स्नुषा वृषाली शिंदे आणि नातू 
रुद्रांश शिंदे या नावांचा उल्लेख करण्यात आला आहे, जे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावांशी मिळते-जुळते आहेत.

अशी रेशनकार्ड उत्पन्नाचे दाखले बनतात कुठे ? आणि ती कोण बनवून देते ? असे अनेक गंभीर प्रश्न जनमाणसांसमोर उपस्थित होतत आहेत. इम्तियाज जलिल गेल्या दोन वर्षांपूर्वीपासून रमाई घरकुल योजनेत छत्रपती संभाजी नगरात कोट्यावधींचा घोटाळा झाला असल्याचा पुराव्यानिशी पाठपुरावा करीत असताना, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने छत्रपती संभाजी नगरात आधारकार्ड, रेशनकार्ड आणि वार्षिक 
90 हजार रुपयांचे उत्पन्नाचे दाखल्यांच्या चौकशीतून एक टोळी आणि मोठा भ्रष्टाचार उजेडात येणार असल्याचंही बोललं जात आहे.

प्राथमिक माहितीनुसार हे रेशनकार्ड कोणत्याही शासकीय कार्यालयातून तयार करण्यात आले नाही. ते बनावट असल्याचे निष्पन्न झाल्याने बनावट रेशनकार्ड बनवणाऱ्या टोळीचा शोध घेण्याची मागणी जलील यांच्याकडून करण्यात येत आहे.

महत्त्वाचे म्हणजे हे रेशनकार्ड हस्तलिखित स्वरुपातील असून, गेल्या दोन वर्षांपासून वापरले जात आहे. आता याप्रकरणी जिल्हा पुरवठा विभागाच्या अन्नधान्य वितरण अधिकारी भारती वाकोडे यांनी फिर्याद केली आहे.

हा प्रकार १२ मार्चला उघडकीस आला असून अजून हे रॅकेट कुठे-कुठे सक्रिय आहे आणि राज्यात अशी किती रेशनकार्ड बनावट आहेत, याचा शोध तपास यंत्रणांना एक आव्हानच  आहे.
To Top