मराठवाड्यावर केवळ निसर्गाचीच अवकृपा झाली नसून राजकीय अन्यायही मराठवाड्याला सहन करावा लागला आहे. मराठवाडा जवळपास 650 वर्षे पारतंत्र्यात होता. मराठवाड्याचे पारतंत्र्य संपले ते 17 सप्टेंबर 1948 ला. म्हणजे भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर एक वर्षांनी मराठवाडा स्वातंत्र्य झाला.
मराठवाड्याने अनेक परकीय सत्तेबरोबर निजामाचे जुलमी शासनही अनुभवले होते. मराठवाड्याने 1724 ते 1948 पर्यंत, म्हणजे 224 वर्षे निजामाचे जुलमी शासन अनुभवले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही निजामाची राजवट चालू होती, यावरून निजामाची सत्ता किती बलशाली होते, हे समजते. हैद्राबाद येथून कारभार चालणाऱ्या निजामाची सत्ता आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा व मराठवाड्यातील 16 जिल्ह्यात होती. स्वातंत्र्यपूर्व भारतात ची 565 संस्थाने होती, त्यापैकी हैद्राबादच्या निजामाचे साम्राज्य सर्वात मोठे आणि श्रीमंत साम्राज्य होते. हे साम्राज्य संपविण्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी जो लढा दिला त्याला ' हैद्राबाद मुक्तिसंग्राम ' असे नाव पडले.
हैद्राबाद मुक्तिसंग्रामाचा इतिहास जाणून घेताना अनेक लोकांचा समज असतो की, यात सोलापूर जिल्ह्याचा काय संबंध ? परंतु अभ्यासाअंती असे दिसून येते की, या आंदोलनात सोलापूर जिल्ह्याचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. अलीकडील नवीन संशोधनानुसार सोलापूर जिल्ह्यातील जवळपास 58 गावे 1948 पर्यंत उस्मानाबाद जिल्ह्यात होती. यामध्ये माढा तालुक्यातील 14, मोहोळ तालुक्यातील 17, बार्शी तालुक्यातील 12, उत्तर सोलापूर तालुक्यातील 13 व दक्षिण सोलापूर तालुक्यातील एका गावाचा समावेश होता. तर उस्मानाबाद जवळची काजळा, वाघोली, उपळा, येडशी, तडवळा व अंबेजवळगा ही गावे सोलापूर जिल्ह्यात होती.
एकेकाळी आजचा सोलापूर जिल्हा नगर जिल्ह्यात, तर उस्मानाबाद जिल्हा गुलबर्गा जिल्ह्यात होता. सोलापूर जिल्ह्यातील अकलूज व अक्कलकोट ही जिल्ह्याची ठिकाणी होती. या प्रकारचे अनेक बदल काळानुरूप होत असतात व त्याचा प्रभाव समाजकारण व राजकारणावर पडत असतो.
सोलापूर जिल्ह्यातील कॅम्पस -
हैदराबाद संस्थानातील उस्मानाबाद जिल्हा हा निजामासाठी महत्त्वाचा होता. उस्मानाबाद जिल्ह्याची भौगोलिक सीमा सोलापूर लगत असल्याने स्वातंत्र्यवीरांना सोलापूरचा मोठा आधार होता. म्हणूनच स्वातंत्र्यवीरांनी सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत अनेक कॅम्प उघडून एल्गार केला.
सोलापूर केंद्र-
बिदर व उस्मानाबाद जिल्ह्यातील कॅम्पचे नियंत्रण केंद्र सोलापूर येथे होते. सोलापूर केंद्राची जबाबदारी फुलचंद गांधी यांच्याकडे होती. फुलचंद गांधी यांच्यासोबत बाबासाहेब परांजपे, व्यासाचार्य संदीकर, राघवेंद्र दिवाण, बळवंतराव नागणे गुरुजी व विशंभरराव हराळकर यांच्यावर शस्त्र खरेदीचे अधिकार दिले होते. सोलापुरातील पत्रा तालमी जवळील फुलचंद गांधी यांच्या माणिक ऑइल मिलमध्ये बॉम्ब बनविण्याचा कारखाना सुरू केला होता. शिवाय पुणे मुंबईतून आणलेले बॉम्ब सर्व कॅम्पना सोलापुरातून पुरवले जात होते.
गौडगाव कॅम्प-
निजाम राजवटील जुलमाला विरोध करण्यासाठी गौडगाव येथे कॅम्प काढण्यात आला होता. गौडगाव येथील माणिकराव गणपतराव गरड व श्रीरंग गुंडी काकडे हे यात आघाडीवर होते. काकडे यांच्या वाड्यातूनच याचे कामकाज चाले. स्टेट काँग्रेसच्या आदेशानुसार या कॅम्पमधून कामकाज होत असे. या कॅम्पची जबाबदारी रामभाऊ जाधवर यांच्यावर होती. त्यांच्यासोबत नरहरराव मालखरे ,मनोहर टापरे, राजेंद्र देशमुख, वसंत देशमुख, शिवाजीराव नाडे, भगवान तोडकरी, नबीपाशा तांबोळी, रामभाऊ सूर्यवंशी, दासा कांबळे, रामभाऊ जाधव या लोकांनी महत्त्वपूर्ण कार्य पार पाडले. या कॅम्पमध्ये जवळजवळ 70 लोकांचा सहभाग होता. गौडगावच्या कॅम्प मधील मुक्तीसैनिकांनी मे 1948 ला नान्नजच्या पोलीस चौकीवर हल्ला चढविला होता, याचा राग धरून रझाकारांनी सर्वसामान्य माणसाला त्रास देण्यास सुरुवात केली होती. गौडगाव कॅम्पने अपसिंगा या ठिकाणच्या रझाकार केंद्रावर हल्ला करण्याचे नियोजन केले. अपसिंगा या ठिकाणी टेकडीवर रझाकाराचे केंद्र होते. त्या ठिकाणी 50 पोलीस व 100 रझाकार होते. या केंद्रावर हल्ला करण्यासाठी गौडगाव, चिंचोली व आगळगाव कॅम्पच्या निवडक सैनिकानी तीन तुकड्या करून रझाकार केंद्रावर हल्ला केला, याचे नेतृत्व श्रीधर वर्तक यांच्याकडे होते. वर्तक यांनी प्रभावी मारा केला, परंतु त्यांची स्टेनगन बंद पडल्यामुळे ती बदलण्याच्या प्रयत्नात शत्रूची गोळी त्यांच्या डोक्याला लागली आणि झुंजार सेनानी श्रीधरराव वर्तक धारातीर्थी पडले. रझाकारांनी मुक्तीसैनिकाला घेरल्यामुळे सर्व मुक्तीसैनिक मागे फिरले. या कारवाईत पोलीस व रझाकार मिळून नऊ जण ठार झाले होते, परंतु श्रीधर वर्तक यांना आपले बलिदान द्यावे लागले. गौडगाव सारख्या अनेक गावांनी हैदराबाद मुक्तीसंग्रामाला आपल्या परीने सहकार्य केले. ही गावे त्यावेळी स्वतंत्र भारतात होती, परंतु आपल्या बांधवांना सहकार्य करण्याच्या भावनेतून त्यांनी मदत केली. कॅम्प मध्ये सहभागी असणारी मंडळी शिस्तबद्ध होती कॅम्प मधील लोकांना सर्वसामान्यांची साथ होती. आपापसात विचारांची देवाणघेवाण करून जीवाची पर्वा न करता हे कार्य करत होते. गौडगाव कॅम्पनी अनेक महत्त्वपूर्ण कामे केली होती. त्यात साराबंदी करणे, करोडगिरी नाका बंद करणे, सिंधीची झाडे तोडणे इत्यादी होय. गौडगाव कॅम्पने निजामाच्या सर्व प्रकारच्या सरकारी अधिकाऱ्यांना गावबंदीही केली होती.
आगळगाव कॅम्प -
बीड जिल्ह्याच्या सीमेलगत बार्शीजवळ उभारलेला सर्वात महत्त्वाचा कॅम्प म्हणजे आगळगाव कॅम्प होय. आगळगाव कॅम्पमधील मुक्ती सैनिक पोलीस आणि रझाकाराच्या अन्यायाने चिडले होते, म्हणून या कॅम्पमधील मुक्तीसैनिकांनी निजामाच्या पोलिसांना धडा शिकवण्यासाठी पोलीस ठाण्यावर हल्ला करून तेथील हत्यारे पळविण्याचा धाडसी निर्णय घेतला. यासाठी त्यांनी बर्दापूर (ता. अंबाजोगाई, जि. बीड) या पोलीस स्टेशनची निवड केली. आगळगाव कॅम्पमधील मुक्तिसैनिकांनी पानगांवजवळ रेल्वे रूळ उखडून एक धाडसी मोहीम यशस्वी पूर्ण केल्यामुळे आत्मविश्वासाने त्यांनी बर्दापूर पोलीस स्टेशनवर हल्ला करण्याचे नियोजन केले. आगळगाव ते बर्दापूर अंतर जवळपास 100 मैल असल्याने योग्य पद्धतीने नियोजन करून, हेराच्या माध्यमातून माहिती काढून पोलीस स्टेशन वरती हल्ला करण्याचे नियोजन झाले. बर्दापूर पोलीस स्टेशन वर हल्ला करण्यासाठी फक्त 30 मुक्तीसैनिकांची निवड केली होती. यात प्रभाकर खेडकर , श्रीनिवास खोत, अण्णा पाटील, काशिनाथ मुकदम, भागवत मास्तर, सुखदेव पांडुरंग, दगडू, हरिश्चंद्र जाधव, भानुदास विश्वनाथ गावकर आणि शेषेराव यांचा समावेश होता. बर्दापूर पोलीस स्टेशनमधील पोलिसांची संख्या व रझाकारांची संख्या पाहता मुक्तीसैनिकांसाठी हे काम जोखमीचे होते परंतु प्रखर इच्छाशक्तीने ही मोहीम यशस्वी केली. मोहीमेच्यावेळी पोलीस स्टेशनवरती काशिनाथ मुकादम यांनी ग्रेनेड फेकून हल्ला केल्यानंतर एकच गोंधळ झाला. कोणत्या दिशेने पळावे हे पोलिसांना समजत नव्हते, पोलीस गावाच्या दिशेने पळत असताना मुक्तीसैनिकांनी पोलिसांवर गोळीबार केला यात चार पोलीसांचा मृत्यू झाला व सात जण जखमी झाले. यानंतर मुक्तीसैनिक ठाण्यात घुसले व ठाण्यामध्ये प्रचंड असलेल्या शस्त्रसाठ्यातून निवडक बंदूका व जास्तीत जास्त साहित्य घेऊन सैनिक निघाले. या पद्धतीने आगळगाव कॅम्पमधील मुक्तीसैनिकांनी निजामाला धडकी बनवणारी एक महत्त्वपूर्ण मोहीम यशस्वी करून, पोलीसाना चकवा देऊन सहीसलामत कॅम्पवर पोहचले.
मुस्ती कॅम्प-
सोलापूर जिल्ह्यातील मुस्ती या ठिकाणी महत्त्वाचा कॅम्प होता. मुस्तीचे भारदस्त व्यक्तिमत्व अण्णाराव पाटील यांनी कॅम्पमधील लोकांची राहण्याची व भोजनाची व्यवस्था केली होती. मुस्ती येथील लालचंद मेहता यांच्या वाड्यात हा कॅम्प होता. सोलापूरचे जिल्हाधिकारी संभाजीराव घाडगे यांनी मुस्तीतील लोकांना बंदुकीचा परवाना दिला होता. याचा उपयोग मुक्तिसैनिकाना झाला. या कॅम्प मधील तरुण मुक्तीसैनिकांनी सरहद्दीवर असलेल्या रझाकारांच्या अनेक केंद्रावर हल्ले केले होते. या कॅम्पवर हनुमंतराव बेलूरकर, रामराव गायकवाड, विठ्ठलराव पाटील व मुस्ती गावातील 50 ते 60 लोकांचा सहभाग होता. मुस्ती कॅम्पचे प्रमुख श्रीनिवास अहंकारी हे होते व त्यांच्यासोबत नानासाहेब चिंचोलीकर, बळीराम पाटील, घालाप्पा जमादार, लालचंद मेहता, अंबाजी कोळी, दादाराव पाटील वगैरे मंडळी होती.
चिंचोली कॅम्प-
बार्शी तालुक्यातील चिंचोली गावी महत्त्वाचा कॅम्प होता. या कॅम्पचे प्रमुख विश्वनाथ आप्पा सोलापुरे होते. निजामाच्या हिंसक हल्ल्याला तोंड देण्यासाठी सैनिकांना हत्यारे पुरवण्याचे काम या कॅम्पमधून होत असे. रझाकारांनी या भागात दहशत निर्माण करून लूटमार सुरू केली होती, त्यांच्या या कार्यवाहीला विरोध करण्याचे कार्य या कॅम्पमधून झाले. आगळगाव कॅम्पने बर्दापूर पोलीस ठाणे ताब्यात घेतले होते, याची प्रेरणा घेऊन चिंचोली कॅम्पमधील तरुणांनी या पद्धतीने पोलीस ठाणे जिंकण्याचा व करोडगिरी नाक्यावर हल्ला करण्याचा प्लॅन केला. त्यातून त्यांनी शेंद्री येथील पोलीस ठाण्यावर हल्ला करण्याचे नियोजन केले , परंतु पूर्वतयारी नसल्यामुळे ही योजना मागे पडली. चिंचोली कॅम्पनी अपशिंग्याच्या कारवाईत मोठी कामगिरी केली होती.
वागदरी कॅम्प-
बाबासाहेब परांजपे यांच्या नेतृत्वाखाली वागदरी कॅम्प उघडला होता. विश्वंभरराव हराळकर हे या कॅम्पला भेटी देऊन मार्गदर्शन करीत होते. या कॅम्पमध्ये अण्णाराव पाटील, गोपाळदेव शास्त्री, नानासाहेब चिंचोलीकर व गुंडाप्पा मुरुमकर यांनी निष्ठेने काम केले. या कॅम्पमधील मुक्तिसैनिकांनी आळंद पोलीस स्टेशन बॉम्ब टाकून उध्वस्त केले तर नाईचाकूर पोलीस स्टेशन लुटण्याची योजना केली. याशिवाय विविध ठिकाणच्या रझाकारांना पळवून लावले. या मुक्तीसैनिकांनीच हिरोळीच्या पठाणांच्या घोळक्यातील बॉम्ब टाकले. नानासाहेब चिंचोलीकर वकील यांनी निजामी सत्तेचे उच्चाटन करण्यासाठी सरहद्दीवरील कॅम्पना हत्यारे पुरवण्याचे काम केले. या कॅम्पमध्ये अनेक मुक्ती सैनिकांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. या व्यतिरिक्त या भागात वाघोली, काजळा, कौडगाव, अंबेजवळगा या ठिकाणी कॅम्प होते. सर्वच कॅम्पनी मुक्ती संग्रामात महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली. पोलीस ठाणे, सरकारी गोदाम, करोडगिरी नाके यांच्यावर हल्ले करणे, रेल्वे रूळ उघडणे, तारा तोडणे, रेल्वे स्टेशन उध्वस्त करणे, वाहतूक खंडीत करणे, वसूल केलेला सारा हस्तगत करणे, सरकारी गोदामावर हल्ले करून शेतकऱ्यांना धान्य परत देणे या प्रकारची अनेक कार्य पार पाडली. स्वामी रामानंद तीर्थ व दिगंबरराव बिंदू यांनी सरहद्दीबाहेर सशस्त्र कॅम्पस उभे करण्याची परवानगी गांधीजींना भेटून घेतली होती. त्यावेळी सरहद्दीलगत एकूण 115 कॅम्प उभारले होते.
या कॅम्प वाल्यांना स्वतंत्र भारतातील जनतेचा व शासनकर्त्याचा पाठिंबा होता. यात सोलापूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी संभाजीराव घाडगे यांनी महत्त्वपुर्ण कार्य करून उघडपणे मदत केली. याशिवाय डी. वाय. एस. पी. पंत व वैराग पोलीस स्टेशनचे फौजदार माने यांनीही मदत केली. या काळात विविध कॅम्पवर जनता स्वतः सहभागी होत असे, विशेष म्हणजे यात उच्चशिक्षित तरुणांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता.
प्रतिसरकार मुक्तापूर स्वराज्य-
क्रांतिसिंह नाना पाटील यांनी इंग्रज शासन झुगारून सातारा भागात प्रतिसरकार ची स्थापना केली होती. नाना पाटील यांनी हैद्राबाद मुक्तीसंग्रामाला बळ देण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमेवरील अनेक गावात सभा घेऊन लोकांना लढण्यासाठी प्रवृत्त करून एकजूट निर्माण केली होती. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रेरणेने हैद्राबाद संस्थाना अंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यातील 52 खेड्यांनी जून 1948 रोजी स्वतंत्र झाल्याची घोषणा केली, यालाच 'मुक्तापूर स्वराज्य' असे नाव दिले. तत्कालीन काँग्रेसचे नेते फुलचंद गांधी, बाबासाहेब परांजपे व चंद्रशेखर बाजपेयी यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी कार्य सुरू झाले. या मुक्तापूर स्वराज्यामध्ये माढा, मोहोळ व परांडा तालुक्यातील 52 गावांचा समावेश होता. या राज्याची राजधानी माढा तालुक्यातील जामगाव या ठिकाणी होती. जामगावच्या विठ्ठलराव पाटलांनी आपला चिरेबंदी वाडा राजधानीसाठी दिला होता.
मुक्तापूर स्वराज्याचे स्वतःचे स्वतंत्र मंत्रिमंडळ होते. या स्वराज्याच्या संरक्षणासाठी 1000 ते 1500 सैनिकही होते ,या सैनिकाकडे शस्त्रास्त्रे ही होती. तसेच या स्वराज्याची स्वतंत्र अशी सहा पोलीस स्थानके होती. शिवाय राज्यातील नागरिकांसाठी न्यायदानाची व्यवस्था ही होती. मुक्तापूर स्वराज्यातील सरकारच्या विविध खात्यामार्फत जनहिताचे कार्य होत होते. हे मुक्तापूर स्वराज्य यशस्वी करण्यासाठी अनेक मुक्तीसैनिकांनी महत्त्वपूर्ण सहभाग नोंदविला.
सोलापूर जिल्ह्यातील शहीद मुक्तिसैनिक -
हैद्राबाद मुक्तिसंग्रामात सोलापूर जिल्ह्यातील अनेकांनी आपला सक्रिय सहभाग नोंदविला होता. यावेळी यातील काहींना वीरमरण आले होते. तुळजापूर तालुक्यालगत असलेल्या धामणगावच्या अनेकांच्या जमिनी तुळजापूर तालुक्यात होत्या, यामुळे धामणगावच्या लोकांना निजाम शासनाकडून त्रास व्हायचा. याला कंटाळून धामणगावच्या शेतकऱ्यांनी निजामाच्या लेव्ही वसुलीला विरोध केला होता. धामणगावच्या गौस व शाहीर लाला मारुती वाघमारे यांनी प्रत्यक्षपणे मुक्ती संग्रामात सहभाग नोंदविला. पोवाडे गाऊन व पत्रिके वाटून लोकांना रझाकारांच्या विरुद्ध लढण्यासाठी प्रवृत्त करण्याचे काम त्यांनी केले. यामुळे निजाम सरकारने चिडून या दोघांना पकडले व काटी गावच्या चावडीजवळ जिवंत पुरले. पण जिवंत पुरताना सुद्धा या मुक्ती सैनिकांनी त्यांच्या जवळचा तिरंगा झेंडा सोडला नाही. हैद्राबाद संस्थानाच्या बाहेर असणाऱ्या एकमेव धामणगावात या मुक्तीसैनिकांचे स्मारक आहे.
बार्शी जवळील ठोग्यांची उपळाई येथे असलेल्या रझाकारांच्या कॅम्पवर हल्ला करण्यासाठी मोतीलाल भुरावत व इतर मुक्ती सैनिक गेले असता झालेल्या चकमतीत मोतीलाल भुरावत शहीद झाले. बार्शी तालुक्यातील हत्तीद गावचा रहिवाशी तुकाराम लोहार हा आळणी गावात संग्रामासाठी फिरत असताना पकडून त्याला व त्यांच्यासोबत असणाऱ्या इतर सात इसम आणि पाच मुलांना रझाकारानी गोळ्या घालून ठार केले.
सोलापूर जिल्ह्यातील मुक्तीसैनिक-
सोलापूर जिल्ह्याचे ज्याप्रमाणे भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनात महत्त्वपूर्ण योगदान होते, तसेच हैद्राबाद मुक्तिसंग्रामात ही महत्त्वाचे योगदान आहे. हैद्राबादच्या निजामाच्या जुलमी राजवटीतून आपल्या शेजारील बांधवांना मदत करण्याची भूमिका सोलापूर जिल्ह्याने घेतली. आपल्या देश बांधवांची सुटका करण्यासाठी हैद्राबाद मुक्तिसंग्रामाचे सोलापूर हे महत्त्वाचे केंद्र होते. सोलापूर येथील भाई छन्नुसिंग चंदेले यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहरातील व जिल्ह्यातील अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी सहभाग नोंदविला.
हैद्राबाद मुक्तीसंग्राम आंदोलनाचा 1948 मध्ये जोर चढला होता. मुक्तीसैनिकांना शस्त्रास्त्रे पाठविण्याचे कार्य करण्याबरोबर इतर मदत पोहोचविण्याचे काम करमाळा तालुक्यातील लोक करीत होते. करमाळा भागातील बाबासाहेब पवार, विश्वनाथ बारबोले यांनी निजामाला शह देण्यासाठी चौक्या जाळणे, कागदपत्रे जाळणे असे उपक्रम केले. 1948 ला हैद्राबादमध्ये भारतीय सैन्य घुसल्यावर अण्णासाहेब जगताप, सरदार परदेशी, गोकुळ परदेशी, किशनराव खाडे, विठ्ठल आलाट, शंकरराव येवले या मंडळींनी विविध भागात जाऊन तिरंगा ध्वज फडकवला व लोकांना धीर दिला.
अक्कलकोट तालुक्यातील अनेकांनी या संग्रामात सहभाग नोंदविला. सिंदखेड येथील कालिदास मारुती पवार यांनी निजाम राजवटीविरुद्ध आवाज उठवून संस्थानातील लोकांना मदत केली व आंदोलनात महत्त्वपूर्ण भूमिका घेतली. याशिवाय या आंदोलनात म. ग. शाब्दे, ब. रा. जंगम, देशपांडे, नागाप्पा हिरेमठ, माधवराव देशपांडे, मलगोंडे गुरुजी, एस .जी. केसूर, बी. टी. माने यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला.
बार्शी तालुक्यातील अनेकांचा या आंदोलनात सक्रिय सहभाग होता. शिवाय अनेक महत्त्वपूर्ण कॅम्प बार्शी तालुक्यात उभारण्यात आले होते. बार्शी तालुक्यातील बलभीम बरीदे, वायचळ, घंटे भोसले, देवधरे व मोतीलाल भुरावत यांनी या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदविला होता. बार्शी तालुक्यातील इतरही अनेक गावाच्या लोकांनी रझाकाराच्या जुलमास विरोध केला होता.
या आंदोलनात मराठवाड्यालगत असलेल्या माढा तालुक्याची भूमिकाही महत्वपूर्ण राहिली आहे 'माढा तालुक्यातील अनेक मुक्तीसैनिकांनी आपला सहभाग नोंदविला. माढा तालुक्यातील जामगाव हे महत्त्वपूर्ण केंद्र होते.
उस्मानाबाद जिल्ह्यालगत असणाऱ्या तालुक्याबरोबरच सोलापूर जिल्ह्यातील इतर अनेक तालुक्यातील मुक्तीसैनिकांनी या संग्रामात सक्रिय सहभाग नोंदविला होता. यात माळशिरस तालुक्यातील सदाशिवराव पाटील, रामभाऊ साळुंखे, बापूराव उपाध्ये, नानासाहेब गवळी, बापूराव ठोंबरे व शिवदास कुंभार यांचा सहभाग होता. अनेक ठिकाणच्या पोलीस स्टेशनवर हल्ले करून जाळपोळ करण्यात यांचा सहभाग होता.
सांगोला तालुक्यातील नाझरे गावचे विश्वनाथ सदाशिव देशपांडे यांना मुक्तीसंग्रामात सहभाग घेतल्याबद्दल दोन वर्षाच्या कारावासाची शिक्षा झालेली होती. वरील प्रमाणे हैद्राबाद मुक्तिसंग्रामात सोलापूर जिल्ह्यातील अनेकांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे.
पूर्वी उस्मानाबाद जिल्ह्यात असलेला व सध्या सोलापूर जिल्ह्यातील नान्नज गावात निजामाचे पोलीस ठाणे, करोडगिरी नाका, लेव्हीचे गोडाऊन, लष्कराचा तळ व रझाकाराचा अड्डा होता. निजाम राजवटीच्या दृष्टीने नान्नज हे ठिकाण महत्त्वपूर्ण होते. मे 1948 ला मुक्तीसैनिकांनी निजाम पोलिसांच्या हातावर तुरी देऊन नान्नचा खजिना लुटला होता. दिवसाढवळ्या निजामाचे पोलीस ठाणे लुटण्याचे काम या भागातील मुक्तीसैनिकांनी केले.
हैदराबाद मुक्ती आंदोलनातील महत्त्वपूर्ण नेते स्वामी रामानंद तीर्थ सोलापूरच्या नॉर्थकोट शाळेचे विद्यार्थी होते. सोलापुरात शिक्षण घेत असतानाच सोलापूर परिसरात सुरू असलेल्या स्वातंत्र्य आंदोलनाचा प्रभाव त्यांच्यावर झाला होता. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत कार्यरत सोलापुरातील चार हुतात्म्याला फाशी दिल्याचा परिणाम त्यांचा मनावर झाला .आपल्या मायभूमीच्या मुक्ततेसाठी आत्मसमर्पण करण्याची त्तीव्र प्रेरणा त्यांच्या मनात हळूहळू बळावत गेली, ती सोलापुरातच.
शेवटी भारतीय सैन्याने हैद्राबाद मुक्तीसाठी सोलापूरहुन प्रारंभ केला. भारतीय सेनेला आदेश देण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल विमानाने सोलापूर विमानतळावर आले होते. त्यांनी भारतीय सैन्याला हैद्राबाद संस्थानात घुसण्याचा आदेश दिला. भारतीय सैन्यापुढे हार पत्करून निजाम शरण आला आणि 17 सप्टेंबर 1948 ला हैदराबाद मुक्त होऊन भारतीय संघराज्यात विलीन झाला. यावरून एकच गोष्ट दिसते, ती म्हणजे हैद्राबाद मुक्ती संग्रामात सोलापूर जिल्ह्याचे व जिल्ह्यातील अनेक मुक्तीसैनिकांचे अमूल्य योगदान आहे.
प्रा. डॉ. शाम लेंडवे (राज्यशास्त्र विभाग प्रमुख)
शिवाजी महाविद्यालय रेणापूर, जिल्हा लातूर.
(शिवभार : मामा पर्यटन व माहिती ग्रुप)
