सोलापूर : शहर व जिल्ह्यात, हर्बल या कंपनीच्या माध्यमातून, कंपनीचे विक्रेते हे स्वयंभू डॉक्टर बनवून, वजन कमी करण्याच्या नावाखाली आर्थिक लूट करीत आहेत. अशा लोकांची चौकशी करून संबंधित दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचं निवेदन मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीने गुरूवारी, समितीचे अध्यक्ष विष्णू कारमपुरी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात, सोलापूर शहरात व जिल्ह्यात हर्बल कंपनीचे औषधे विक्री करणारे एजंट व किरकोळ विक्री करणारे लोक या हर्बल कंपनी औषधाने वजन कमी करण्यासाठी, विना आवश्यक खोटी माहिती देऊन आर्थिक लूट करीत आहेत.
सध्याच्या धकाधकीच्या युगात, लोकांचे वजन वाढणे, वजन कमी होणे, हृदयविकार झटका येणे असे अनेक रोग मोठ्या प्रमाणात नागरिकांना होत आहेत. विशेषतः वजन वाढल्यामुळेच अनेक रोग होत आहेत, असे नागरिकांना वाटते.
याचाच अंदाज घेऊन हर्बल कंपनीचे एजंट व विक्रेते कोणतीही पदवी धारण केलेली नसताना स्वतः डॉक्टर आहे, असे भासवून लोकांना आरोग्याचे चुकीचे धडे देतात.
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आमच्याकडे मोठे पोलीस अधिकारी, व्यापारी, सरकारी अधिकारी यांनी सुद्धा हे औषध घेतल्यामुळे त्यांचे वजन कमी झालं आहे, अशी थाप मारतात. अगोदर लठ्ठपणाचा फोटो व काही दिवसानंतर हे हर्बल औषध घेतल्यामुळे वजन कमी झाल्याचा सडपातळ फोटो दाखवून, सोशल मीडियावर व्हायरल करतात अन् त्या छायाचित्रांच्या आडून सामान्य लोकांची फसवणूक करतात.
त्याचबरोबर एका वजन काटा मशीनवर उभे करून त्यांच्या हातात एक मोबाईलप्रमाणे हँडल देतात, त्यावर ग्राहकास उभे राहण्यास सांगतात. त्याचबरोबर काही डिजिटल आकडे त्या मशीनवर येतात, त्या आकड्याच्या आधारे ग्राहकांना तुम्हाला शरीरासाठी आवश्यक असणारे विविध द्रव शरीरात कमी आहेत, असं सांगून हे हर्बल औषध घेणे कसे गरजेचे आहे, यासंबंधी माहिती देऊन हर्बल कंपनीच्या किंमतीच्या दुप्पट, तिप्पट पैसे घेऊन फसवणूक करीत आहेत.
या हर्बल कंपनीच्या औषधाची कुठलीही माहिती व अनुभव नसताना चालणारी लूट त्वरित थांबवावी, या हर्बल कंपनीचे विक्रेते व बनावट डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई करावी, असे निवेदनात नमूद करण्यात आलं आहे.
विष्णू कारमपुरी यांच्या नेतृत्वाखाली निवेदन दिलेल्या शिष्टमंडळात रेखा आडकी, शिवानंद कट्टीमनी, रमेश जगले, पप्पू शेख, गुरुनाथ कोळी, श्रीनिवास बोगा, विठ्ठल कुराडकर, राधिका मिठ्ठा, सविता दासरी, राणी दासरी, पद्मा मॅकल, लक्ष्मी गुंटला, शोभा पोला यांच्यासह अन्य महिला कार्यकर्ते उपस्थित होते.
