अभिलेखावरील विनायक नारखंडी एमपीडीए अन्वये स्थानबध्द

shivrajya patra

सोलापूर : शहरातील जोडभावी पेठ पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार विनायक दत्तात्रय नारबंडी (वय-३१ वर्षे) याच्याविरुध्द गेल्या काही वर्षापासून घातक शस्त्राने दुखापत करणे, मोबाईल चोरी, घरफोडी, जबरी चोरी, खंडणी मागणे, सरकारी कामात अडथळा अशा स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यापासून त्याच्या विरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या होत्या. त्यातूनही त्याच्यात बदल न झाल्याने त्यास एम पी डी ए अन्वये स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली.

पोलीस आयुक्तालयाच्या दप्तरी विनायक दत्तात्रय नारबंडी (रा. घोंगडे वस्ती, भवानी पेठ, सोलापूर) याच्याविरुद्ध गंभीर स्वरुपाचे १५ गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे शहरातील नागरीकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन, सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली आहे. त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे व्यापारी व सामान्य नागरीकांत दहशत असून त्याच्याविरुध्द सामान्य नागरीक उघडपणे पोलीसांना माहीती देत नाहीत, असं पोलिसांचं म्हणणं आहे.

त्यास गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी सन २०२३ व २०२४ मध्ये वेगवेगळ्या अधिनियमाद्वारे प्रतिबंधक कारवाया करण्यात आल्या होत्या, मात्र त्याच्या वर्तनात बदल न झाल्याने पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांनी शुक्रवारी, २० जून रोजी त्याच्याविरुध्द स्थानबध्दतेचे आदेश निर्गमित करुन स्थानबध्द आदेशाची बजावणी करुन, येरवडा कारागृह, पुणे येथे दाखल करण्यात आले.

To Top