सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री ते मुस्ती रस्त्यावर मंगळवारी सकाळी घडलेल्या भीषण अपघातात तिघे ठार झाले. मोटारसायकलला अज्ञात क्रमांकाच्या भरधाव वाहनाची धडक लागून ही दुर्घटना घडली. अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहनचालक घटनास्थळावरून वाहनासह पसार झाला.
याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, मुस्ती येथील तिघे जण, त्याच्या नियमीत कामासाठी MH13/DJ5466 या क्रमांकाच्या मोटारसायकलवरून निघाले होते. या बांधकाम कामगारांना अज्ञात वाहनानं ठोकरल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला.
देविदास दुपारगुडे (वय-40 वर्षे), नितीन वाघमारे (वय-35 वर्षे) आणि हनुमंत पवार (वय-40 वर्षे) अशी मृतांची नावे असून ते मुस्ती गावचे रहिवासी होते. या दुर्घटनेनं मुस्ती गावावरच जणू शोककळा पसरलीय.
अपघाताचं वृत्त कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते, असं प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.
