संत साहित्य सेवा संघाचे 'पुरुषोत्तम पुरस्कार' आणि 'सांगाति' पुरस्कार जाहीर

shivrajya patra
प्रा. डॉ. श्रुती वडगबाळकर आणि ह.भ.प. सूर्यकांत धोत्रे मानकरी

सोलापूर : संत साहित्य सेवा संघातर्फे देण्यात येणाऱ्या पुरुषोत्तम पुरस्कारासाठी प्रा. डॉ. श्रुती श्री वडगबाळकर तसेच सांगाति पुरस्कारासाठी ह. भ. प. सूर्यकांत लक्ष्मण धोत्रे ह्यांची निवड करण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष सु. स. देशमुख आणि कोषाध्यक्ष रमेश विश्वरूपे ह्यांनी दिली.

ज्येष्ठ पत्रकार आणि निरुपणकार विवेक घळसासी ह्यांच्या हस्ते बुधवारी, 28 मे रोजी सायंकाळी 06 वाजता ज्ञान प्रबोधिनी उपासना मंदिर, डफरिन चौक, सोलापूर येथे पुरस्कार प्रदान समारंभ संपन्न होणार आहे.

संत साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी प्रतिवर्षी संस्थेतर्फे पुरुषोत्तम पुरस्कार देण्यात येतो. पुरस्काराचे हे पंधरावे वर्ष आहे. मानपत्र, सन्मान निधी रुपये अकरा हजार आणि शाल असं पुरस्काराचे स्वरूप आहे. 

पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेल्या प्रा. डॉ. श्रुती श्री वडगबाळकर ह्यांनी विविध वृत्तपत्रात संत साहित्य विषयक लेख लिहिले आहेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी स्त्री संतांच्या जीवनावर त्यांनी व्याख्याने दिली आहेत. आजपर्यंत स्त्री संत आणि अध्यात्मिक विषयांवरील त्यांची 06 पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.

संस्थेच्या वतीने ह्या वर्षीपासून "संतसेवा-सातत्य-निष्ठा" ह्यांच्या सन्मानार्थ वै. दा. का. तथा भाऊ थावरे आणि वै. विजयाताई दा.थावरे स्मृति प्रित्यर्थ सांगाति पुरस्कार देण्यात येणार असून त्यासाठी ह. भ. प. सूर्यकांत लक्ष्मण धोत्रे ह्यांची निवड करण्यात आली आहे. सन्मान चिन्ह, सन्मान निधी रुपये अकरा हजार आणि शाल असं पुरस्काराचे स्वरूप आहे. 

सूर्यकांत धोत्रे हे निवृत्त शासकीय अधिकारी असून गेली ४५ वर्षे पंढरीची महिन्याची वारी करीत आहेत. सोलापूरच्या लक्ष्मण महाराज धोत्रे घराण्याशी ते निगडीत आहेत. लेखन, पारायण माध्यमातून ते अनेक वर्षे निष्ठेने संत सेवा रुजू करीत आहेत.

To Top