गुटखा तस्करीचं मोठं ' रॅकेट ' कार्यरत; अन्न व औषध प्रशासनाच्या निष्क्रियतेविरुद्ध बेमुदत धरणे आंदोलन

shivrajya patra

 

सोलापूर : संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिबंधीत असणारा गुटखा आणि गुटखा तस्करांना जोडभावी पेठ पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये परराज्यातून तस्करी करुन विक्री व सप्लाय करण्याचं मोठं ' रॅकेट ' कार्यरत आहे. या रॅकेटला संबंधीत पोलिस स्टेशनचे वसुलदार तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे सुरू आहे. याप्रकरणी कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी तक्षशिला मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने मंगळवारी, २९ एप्रिल रोजी विलास सरवदे यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलंय.

येथील कुंभारवेस, बाळीवेस, जोडभावी पेठ  आदी भाग आजमितीपर्यंत गुटखा, सुगंधी तंबाखू, मावा आदी तंबाखूजन्य पदार्थ सप्लाय आणि विक्रीसाठी कुप्रसिध्द आहे. या व्यवसायाशी निघडीत व्यापाऱ्यांचं व्यापारांचं मुख्य केंद्र म्हणून पाहिलं जातं. महाराष्ट्रात गुटखा वाहतूक, साठा, विक्री अशावर प्रतिबंध आल्यापासून त्यात शेळगी परिसराची भर पडलीय. 

महाराष्ट्रात प्रतिबंधीत गुटख्यावर प्रभावी कारवाई प्रभावीपणे होत असल्याचं दिसून येत नाही. एखादा अपघात वा दुर्घटना घडल्यावर कधी काळी पोलीस ठाण्याच्या हद्दीचा प्रश्न उभा राहायचा, तसं गुटखा विरोधी कारवाई पोलीस का करत नाहीत. असा सामान्यांच्या मनात प्रश्न असतो. खरे तर अशा बाबीवर कारवाई करण्यासाठी स्वतंत्ररीत्या अन्न व औषध प्रशासन कार्यरत असते.

ज्या विभागानं कारवाई करायची, त्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी वर्गानं गुटखा विरोधी कारवाई करण्याच्या मुद्द्याकडे पाठ फिरवलीय. ते त्यांच्या विभागाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमार्फत गुटखा तस्करांकडून मोठ्या प्रमाणात वसुलीची कामे करीत आहेत. गुटखा व मावा निर्मितीसाठी लागणाऱ्या सुगंधी तंबाखू जन्यपदार्थ वाहतूक साठा आणि विक्री च्या माध्यमातून दरमहा वसुली करीत असून या अवैध व्यवसायाचा मासिक टर्नओवर कोटीच्या पलीकडे असल्याचा आरोप उपोषणकर्ते विलास सरवदे यांनी केला आहे.

सोलापुरातील तरुणाईला गुटखा व्यसनाच्या विळख्यातून सोडविण्यासाठी तक्षशिला मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद प्रक्षाळे यांच्या मार्गदर्शनाखाली विलास सरवदे यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केला आहे. मंगळवारी दुपारी मिलिंद प्रक्षाळे यांनी आंदोलन स्थळी आंदोलनकर्ते विलास सरवदे यांची भेट घेतली.

अंडरग्राउंड पद्धतीने चालणाऱ्या गुटखा-मावा अवैध कारभारात गुंड प्रवृत्तीच्या हस्तकांचा मोठ्या प्रमाणात सक्रिय सहभाग आहे. त्यात ज्ञानेश्वर शिरसट ऊर्फ आबा, राहुल सौदागर ऊर्फ डॉन, भिमा पुजारी ऊर्फ बॉस, महांतेश गुब्याड, सोहेल कुरेशी तसेच शेळगी व मित्र नगरमधील आळगी बंधू, मराठा वस्ती येथील प्रभाकर उर्फ दादा अशी गुंड मंडळी हे नेटवर्क चालवत आहेत.

या मंडळींचे मागील गुन्हे रेकॉर्डवर तपासून पाहता. त्यांच्यावर प्रचलित कायद्यान्वये ठोस कारवाई करण्यात यावी, हा गोरख धंदा कायमचा बंद करण्यात यावा, या मागणीकरीता तक्षशिला बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने, २९ एप्रिलपासून जिल्हा परिषद येथील प्रवेशद्वारावर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आलं, असून ते अवैध धंदे बंद होत नाहीत, तोपर्यंत धरणे आंदोलन सुरू राहील, असं उपोषणकर्ते विलास सरवदे यांनी म्हटलं आहे. 

To Top