स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज अध्यासन केंद्रामार्फत विद्यापीठात वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
सोलापूर : तरुण पिढी संस्कारक्षम आणि धैर्यशील व्हावी, यासाठी छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याचा आणि पराक्रमाचा इतिहास त्यांना अवगत व्हावा, या उद्देशाने स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज अध्यासन केंद्राचे कामकाज सुरू असल्याचे मत या केंद्राचे अध्यक्ष तथा विद्यापीठाच्या अधिसभा व व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. सचिन गायकवाड यांनी व्यक्त केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अंतर्गत स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज अध्यासन केंद्राच्या वतीने राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. एकूण 45 विद्यार्थी- विद्यार्थींनीनी सहभाग नोंदविला.
समाज कोणत्या दिशेने चालला आहे, याचा मागोवा घेऊन भावी पिढीने आपली वाटचाल करायला हवी अशी अपेक्षा आपल्या मनोगतातून माजी आमदार विनायकराव पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.
मान्यवरांच्या शुभहस्ते वक्तृत्व स्पर्धेचे उदघाट्न करण्यात आले. यावेळी मंचावर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज अध्यासन केंद्राचे अध्यक्ष प्रा. सचिन गायकवाड, समन्वयक प्रा. डॉ. विकास पाटील, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे, अध्यासन केंद्राचे सदस्य डॉ. नेताजी कोकाटे, डॉ. विष्णू वाघमारे, डॉ. विकास शिंदे, डॉ. अरुण सोनकांबळे यांची उपस्थिती होती.
वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षण विठ्ठलराव शिंदे महाविद्यालय, टेंभूर्णी येथील डॉ. संजय साठे आणि शिवाजी महाविद्यालय बार्शी येथील डॉ. रविकांत शिंदे यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत डॉ. विकास शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन सहायक कुलसचिव तथा अध्यासन केंद्राचे सचिव डॉ. शिवाजी शिंदे यांनी केले.