सोलापूर : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांना अपशब्द वापरुन घोषणाबाजी केल्याप्रकरणी ०६ शिवसैनिकांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय. हा प्रकार गुरुवारी होटगी रस्ता विमानतळासमोर सायंकाळी घडला.
मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे गुरूवारी जिल्हा दौऱ्यावर होते. ते हवाईमार्गे विमानतळावर उतरले. त्यांचा ताफा विमानतळातून नियोजित कार्यक्रमाच्या स्थळी जात असताना विमानतळाबाहेर शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट) या पक्षाचे कार्यकर्त्यांनी त्यांना कोंबडीचं चित्र दाखवत अपशब्द वापरून घोषणाबाजी केली.
या प्रकरणी जय दत्तात्रय साळुंके (वय-४० वर्षे, रा. भारतरत्न इंदिरा नगर, ७० फुट रोड, सोलापूर) यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार विक्रम खंडागळे, संताष घोडके, अमित मिश्रा, आणि अन्य ०३ इसमांविरूद्ध भा. न्याय संहिता कलम २९६,१८९(२),३५१(२), मपोकाक १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस उपनिरीक्षक तरंगे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.