सोलापूर : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूरच्या अधीक्षक श्रीमती भाग्यश्री जाधव, उपअधीक्षक एस. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोलापूर शहर व जिल्ह्यात, बुधवारी, १३ नोव्हेंबर रोजी अवैध विनापरवाना मद्य पिण्यास परवानगी देणाऱ्या ०८ ढाब्यांवर धडक कारवाई केलीय. या कारवाईत अवैध ढाबा चालक व मद्यपींना २,९२,५०० रुपयांचा दंड करण्यात आलाय.
बुधवारी दिवसभरात मौजे मुळेगाव तांडा, बक्षी हिप्परगा, वरळेगाव तांडा, शिवाजीनगर तांडा परिसरात कारवाई करुन अवैध हातभट्टी दारु निर्मिती केंद्रावर कारवाई करुन सदर कारवाईत एकुण ११,४५० लिटर रसायन, ५७५ लिटर हातभट्टी दारु असा एकूण ७,१४,९९५ रूपयांचा प्रोव्हीबिशन गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पुणे विभागाचे विभागीय उपायुक्त सागर धोमकर यांच्या निर्देशानुसार करण्यात आल्याचं राज्य उत्पादन शुल्क, सोलापूर विभागाने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटलंय.
ब्रीथ् अॅनलायझरचा वापर करुन वैद्यकीय चाचणी नंतर मातोश्री ढाबा, दुर्गा ढाबा होटगी रोड, जयभवानी ढाबा मंगळवेढा रोड, सावजी कोड्रिंक्स, कन्ना चौक, तसेच पंढरपूर कासेगांव येथील साईराजे, महाराजा ढाबा, तारापूर, माढा येथील राणा ढाबा, माळशिरस येथील सावनी ढाबा येथे कारवाई करून ढाबा मालक व मद्यपी ग्राहकांना न्यायालायासमोर हजर केले असता, ढाबा मालकास प्रत्येकी २५००० रुपये तर मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी ३००० रूपये इतक्या द्रव्य दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.
यात एकूण २,९२,५०० रुपये इतका दंड जमा करुन घेण्यात आला. तसेच अशा प्रकारे अवैध ढाब्यांवर कारवाई यापुढे अशीच चालू राहणार आहे. परवाना नसणाऱ्या ठिकाणी मद्य प्राशन केल्याने संबंधित जागा मालक व मद्यपी या दोघांवर कारवाई होऊ शकते, याची नोंद संबंधितानी घ्यावी, असंही अधीक्षक जाधव यांनी सांगितलंय.
ही कारवाई निरीक्षक आर. एम. चवरे, जे. एन. पाटील, ओ. व्ही. घाटगे, डी. एम. बामणे, पंकज कुंभार, भवड, तसेच दुय्यम निरीक्षक एस. डी. कांबळे, आर. एम. कोलते, धनाजी पोवार, समाधान शेळके, सुखदेव सिद, श्रीमती अंजली सरवदे, सचिन गुठे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण, मोहन जाधव, संजय चव्हाण, विजय पवार, गुरुदत्त भंडारी, आनंद जोशी, जवान सर्वश्री आण्णा करचे, नंदकुमार वेळापुरे, शोएब बेगमपुरे, वसंत राठोड, चेतन व्हनंगुटी, इस्माईल गोडीकर, कपील स्वामी, प्रशांत इंगोले, अनिल पांढरे, विनायक काळे, विकास वडमिले, विजय शेळके, योगीराज तोग्गी, तानाजी जाधव, रेवणसिध्द कांबळे, वाहनचालक रशीद शेख, दिपक वाघमारे व संजय नवले यांनी पार पाडली.
अवैध मद्यविक्री, अवैध धंदे व वाहतुकीविरोधात कारवाई यापुढेही चालू राहणार असून अवैध मद्याबाबत माहिती असल्यास टोल फ्री १८००२३३९९९९ क्रमांक अथवा व्हॉटस अॅप क्रमांक ८४२२००११३३ या कार्यालयास माहिती दिल्यास माहिती देणाऱ्यांचे नाव गुप्त ठेवले जाईल, असे राज्य उत्पादन शुल्क, सोलापूरच्या अधीक्षक श्रीमती भाग्यश्री जाधव यांनी म्हटलं असून अवैध मद्यासंबंधी माहिती कळविण्याचं आवाहन केलं.
...... चौकट ........
आचारसंहिता काळात १,४२,२१,३४४ रूपयांचा मुद्देमाल जप्त
आचारसंहिता कालावधीमध्ये १५ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर या कालावधीमध्ये सोलापूर शहर व जिल्ह्यात एकूण २५९ गुन्हे नोद करण्यात आले. त्यात २५७ जणांवर कारवाई करण्यात आलीय. या कालावधीत केलेल्या कारवाईत ९१,२३० ली. गुळमिश्रित रसायन, ७७८८ ली. हातभट्टी दारु, १६७१ ली. ताडी, ९४३ ब.ली. देशी दारू, ६१८ ब.ली. विदेशी दारु, ७७.९७ ब. ली. बिअर ८३.८८ ब. ली. बनावट विदेशी मद्य व ५९ वाहनासह एकूण १,४२,२१,३४४ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.