आशीर्वाद यांनी सादर केली विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्या तयारीची माहिती
सोलापूर : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्त करण्यात आलेल्या सर्व संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी अत्यंत नि:ष्पक्षपणे निवडणूक कामकाज पार पाडून ही निवडणूक प्रक्रिया यशस्वी करावी, असे आवाहन पुणे विभागाचे विभागीय महसूल आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या निवडणूक कामकाजाच्या आढावा विभागीय आयुक्त डॉ. पूलकुंडवार यांनी घेतला, त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलीस शहर आयुक्त एम. राजकुमार, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, पोलीस शहर उपायुक्त दिपाली काळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर यांच्यासह सर्व नोडल अधिकारी, सर्व विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त डॉक्टर पुलकुंडवार पुढे म्हणाले की, भारतीय लोकशाही प्रक्रियेवर लोकांचा विश्वास आहे. हा विश्वास अधिक दृढ होण्यासाठी सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अत्यंत नि:ष्पक्षपणे निवडणूक कामकाज केले पाहिजे. तसेच सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांच्या अधिनस्त सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण कार्यक्रम अत्यंत व्यवस्थित घ्यावेत. विशेषतः सर्व सेक्टर ऑफिसर यांना 'हँड्स ऑन ट्रेनिंग' अत्यंत काटेकोरपणे घेण्यास सूचित करावे. बुधवारी, 20 नोव्हेंबर रोजी मतदानाच्या दिवशी प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया दिलेल्या वेळेत सुरू झाली पाहिजे यासाठी सेक्टर ऑफिसर ची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.
या निवडणुकीला पोस्टल बॅलेटचे मतदान मोठ्या प्रमाणावर होऊ शकते, त्याचा अंदाज घेऊन मतमोजणीच्या वेळी मतमोजणी केंद्रावर यासाठी अत्यंत चांगली व्यवस्था ठेवावी. तसेच निवडणूक कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी कर्मचारी मतदानापासून वंचित राहणार नाहीत, यासाठी योग्य ती दक्षता घ्यावी, अशा सूचना आयुक्त पुलकुंडवार यांनी केल्या.
प्रत्येक मतदान केंद्रावर निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात व त्याची खात्री संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी करून घ्यावी. स्वीप अंतर्गत मतदार जनजागृती मोहीम मोठ्या प्रमाणावर राबवून सोलापूर जिल्ह्यात जास्तीत-जास्त मतदानाची टक्केवारी कशा पद्धतीने वाढेल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असंही त्यांनी सूचित केले.
प्रारंभी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघात जिल्हा प्रशासनाने केलेल्या तयारीची माहिती बैठकीत दिली. यामध्ये भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे दिनांक 22 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर या कालावधीत नामनिर्देशन पत्र दाखल झालेले होते.
सोमवारी, 04 नोव्हेंबर रोजी अखेर एकूण 334 नामनिर्देशन दाखल केलेल्या उमेदवारापैकी 150 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले असून 184 उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील 03,723 मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज असून यातील 50 टक्के मतदान केंद्रावर वेब कास्टिंग करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पोलीस शहर आयुक्त एम. राजकुमार तसेच पोलीस अध्यक्ष अतुल कुलकर्णी यांनी सोलापूर शहर व सोलापूर ग्रामीण भागात विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अत्यंत चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच सोलापूर शहरामध्ये 14 लाख रुपये किंमतीची दारू-गांजा व कॅश पोलिसांनी जप्त केल्याचे सांगितले, तर सोलापूर ग्रामीण भागात पोलीस विभागाने 01 कोटी 16 लाख रुपये किंमतीची दारू व गांजा जप्त केल्याची माहिती दिली.
***