अल्पसंख्यांक शैक्षणिक समन्वय परिषदेस देशभरातील विचारवंत, साहित्यिक, कुलगुरू, कुलपतींची उपस्थिती
वर्तमानाचे भान बाळगा, गुणवत्तापूर्ण शिक्षण घ्या व आर्थिक नियोजनाशिवाय प्रगती अशक्य : माजी कुलपती जफर सरेशवाला
सोलापूर : मानवाने ज्ञानाच्या आधारे प्रगती केली आहे, त्याच ज्ञानाच्या आधारे समाजातील विषमता मिटवू, स्त्रीयांवरील अन्याय रोखू, सामाजिक सांस्कृतिक व वर्णिय विषमता रोखत स्वातंत्र्याचे रक्षण करणारी कोनशीला विद्यापीठ कार्यस्थळावर उभी करुन वळसंग येथे एशियन मायनॉरीटी युनिव्हर्सिटीचा पायाभरणी सोहळा पार पडला.
ग्लोबल एज्युकेशनल अँड हेल्थ ऑर्गनायझेशन सोलापूर, एशियन सेंटर फॉर सोशल स्टडीज व मासिक गुलबूटेच्या वतीने नियोजित एशियन मायनॉरिटी युनिव्हर्सिटीच्या पायाभरणी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे औचित्य साधून दि. हेरीटेज लॉन, सोलापूर येथे सकाळी दहा ते रात्री दहा वा. दरम्यान अल्पसंख्यांक शैक्षणिक समन्वय परिषद पार पडली.
शिक्षणाच्या अभावामुळे अल्पसंख्यांकाची राजकीय व सामाजिक स्थिती खालावत चालली आहे. सांस्कृतिक पातळीवर आपण कोण आहोत, हे आपण विसरत चाललो आहोत. आर्थिक नियोजनातील मागासलेपणा, कौटुंबिक जीवनाचे खालावणारे स्तर या बाबी आपली सामाजिक प्रतिमा निर्धारीत करत आहेत. आधुनिक शिक्षण घेऊनच आपण यातून बाहेर पडू शकतो, असे सांगितले.
अध्यक्षीय भाषणाआधी सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, हैदराबादचे आमदार आमीर अली खान यांनी नवीन विद्यापीठाच्या उभारणीस शुभेच्छा दिल्या.
उद्घाटनानंतर मुस्लिम समाजातील शिक्षणाची स्थिती, आधुनिक शिक्षणाची गरज, मुस्लिम शिक्षण संस्थांची स्थिती या विषयावर तीन सत्रात परिषद संपन्न झाली, या सत्रांमध्ये अलीगड विद्यापीठाचे प्रा. सऊद आलम कासमी, प्रा. शाहीद खोत, प्राध्यापक डॉ. शाफय किदवाई, मौलाना सज्जाद नोमानी, समीर सिद्दीकी, मुबारक कापडी, खालीद सैफुद्दीन, आमीर अन्सारी, डॉ. अंजुम कादरी यांनी विचार व्यक्त केले.
...चौकट...
सोलापुरात नवीन विद्यापीठाच्या पायाभरणी एक ऐतिहासिक क्षण : आमदार आमिर अली खान
अल्पसंख्यांक शैक्षणिक स्थिती सुधारण्यासाठी सोलापूरसारख्या शहरामध्ये विद्यापीठाची उभारणी केली जात आहे, हे खूप महत्वाचे आहे. शिक्षणाशिवाय अल्पसंख्यांक समाज आजच्या स्थितीत बाहेर पडू शकत नाही. त्यामुळे सर्व प्रकारच्या परिवर्तनासाठी हे विद्यापीठ उभारणी ही समाजाची ऐतिहासिक गरज आहे. त्यामुळेच हा क्षण देखील ऐतिहासिक आहे. असे मत आमदार अमीर अली खान यांनी मांडले.
आसिफ इक्बाल यांची नवीन विद्यापीठ स्थापनेची तळमळ सामाजिक नेतृत्व करणार्यांसाठी आदर्श ठरेल : चौगुले
सामाजिक, सांस्कृतिक दृष्ट्या नेतृत्व करणारा व्यक्ती शैक्षणिक पातळीवर प्रगल्भ विचार करणारा असेल. तर तो समाजाला एक नवे शैक्षणिक व सांस्कृतिक भान देवू शकेल. आसिफ इक्बाल यांनी विद्यापीठ स्थापनेसाठी घेतलेला पुढाकार या दृष्टीने महत्वाचा आहे. नव्या नेतृत्वाच्या निर्मितीसाठी तो गरजेचा आहे. त्यामुळे त्यांचे हे पाऊल आदर्श ठरेल.