![]() |
धुळे : लोकशाही न्युज मराठी चॅनलवर "साक्री पोलीस ठाण्यात शिस्तीची ऐशीतैशी" व "पोलीस ठाण्यात टेबलावर झोपून पाहिली मॅच" "पोलीसांनी मोडली पोलीस ठाण्याची शिस्त" सोबत पोलीस स्टेशन इमारत व बोर्ड अशा आशयाची बातमी साक्री पोलीस स्टेशन येथे शासकीय गणवेशावर आराम कक्षात आराम करीत असतांनाचा व्हिडीओ आराम कक्ष नावाची नेमप्लेट झाकुन ठेऊन प्रसारीत करुन जनमानसांमध्ये पोलीस दलाविषयी अप्रितीची भावना निर्माण होईल, असे कृत्य केल्याप्रकरणी साक्री पोलीस ठाण्यात पत्रकार व संपादकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.
गुरुवारी, १६ नोव्हेंबर रोजी सकाळपासून बालानंद नगरी, साक्री येथे मिरवणूक व शिवपुराण वाचन कार्यक्रम असल्याने त्या ठिकाणी बंदोबस्तकामी नेमलेले कर्मचारी पोहेकॉ/१२५७ दिपक मधुकर विसपुते व पोहेकॉ/२३० विक्रांत अशोक देसले साक्री पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी करीता असलेल्या आराम कक्ष रूममध्ये आलो. सदर आराम कक्ष रुममध्ये जेवण करुन मोबाईलवर वर्ल्डकपमधील सेमीफायनलची क्रिकेट मॅच आराम कक्षामधील शासकीय गणवेशावर टेबलावर आराम करीत पाहत असतांना संध्याकाळी पत्रकार उमाकांत लक्ष्मण अहिरराव (लोकशाही प्रेस) यांनी, त्यांच्या मोबाईलमध्ये आराम कक्षामध्ये शासकीय गणवेशात आराम करत असतांना व सदर कालावधीत माझे मोबाईलवर क्रिकेट मॅच पाहत असतांना जनमानसांमध्ये पोलीसांविषयी अप्रितीची भावना निर्माण करण्यासाठी उपरोक्त मथळ्याखाली वृत्त प्रसारीत केले.
द्वेष, आकसबुध्दीने व जनमानसांत पोलीसाची प्रतिमा मलिन होऊन अप्रितीची भावना पसरविण्याच्या उद्देशाने इलेक्ट्रानिक बातमी तयार करुन लोकशाही न्यूज मराठी चॅनल या चॅनलवर पाठविली. त्या चॅनलचे संपादकानी त्या बातमीची शहानिशा न करता ती प्रसारीत केली.
याप्रकरणी उमाकांत लक्ष्मण अहिरराव (रा. देगांव, ता. साक्री, लोकशाही न्युज मराठी चॅनल, पत्रकार) व लोकशाही न्युज मराठी चॅनलचे संपादक यांचेविरुध्द भादंवि कलम ५०१,५०२ सह पोलीस (अप्रीतीची भावना चेतावणे) अधिनियम १९२२ चे कलम ३ अन्वये पोहेकॉ दिपक विसपुते या कर्मचाऱ्याने. फिर्याद केली. त्यानुसार पत्रकार व संपादक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक प्रसाद रौंदळ या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.